नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रची १.८९ कोटी रुपयांची फसवणूक करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी गुलाम अशरफी याचा वाळू आणि कोळसा तस्करीत सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. वाळू आणि कोळशाची अवैध वाहतूक करण्यासाठी इतरांच्या नावाने टिप्पर अशरफीने खरेदी केले आहेत. नागपूर ग्रामीण व्यतिरिक्त चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये या माध्यमातून तस्करी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी अशरफीच्या ऑफिस बॉयसह चार आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इम्रान खान उस्मान खान (३३, रा. सुदामनगर), नितेश कमलनाथ गजभिये (२९, खापरखेडा), हंसराज पौनीकर (४३, अयोध्यानगर) आणि चिंटू चेतलाल महंतो (३४, रा. चिंतेश्वरनगर, वाठोडा) यांचा समावेश आहे. गुलाम अशरफी याने त्याचा ऑफिस बॉय लोकेश सरपे आणि इम्रान खान यांना डब्ल्यूसीएलचे कर्मचारी म्हणून दाखवत त्यांच्या नावे बनावट पेमेंट स्लिप, स्टॅम्प पेपर, ओळखपत्र तयार करून बँकेत सादर केले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या इतवारी शाखेतून दोघांच्याही नावे १.८९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकेच्या वतीने कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या एजन्सीनेदेखील कागदपत्रे योग्य असल्याचा निर्वाळा दिला. बॅंकेने तक्रार केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी ३१ मे रोजी गुलाम अशरफीला अटक केली. तपासात अशरफीने इतरांच्या नावावर टिप्पर खरेदी करून वाळू आणि कोळसा तस्करीत वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरटीओमध्ये तपास केला असता लोकेश सरपे याच्या नावे अनेक टिप्पर उघडकीस आले. या टिप्परचा वाळू तस्करीसाठी वापर केला जात आहे. तेव्हापासून पोलीस लोकेश, इम्रान आणि इतर आरोपींचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री इम्रानसह चार आरोपींना पोलिसांनी पकडले. इम्रानने अशफरीकडून स्वतःच्या आणि इतरांच्या नावाने बनावट कागदपत्रांवर टिप्पर खरेदी केल्याची कबुली दिली आहे. बँकेची नोटीस मिळाल्यानंतर गुलामच्या बनावटगिरीची माहिती मिळाल्याचे त्याचे म्हणणे आहे. याबाबत त्याने अशरफीला विचारणा केली असता त्याने इम्रानला शांत केले. त्यानंतरही विचारणा केली असता यापुढे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यामुळे इम्रानने मौन बाळगले होते.