बहुजन रंगभूमीचे सादरीकरण : रंगकर्मींचा सत्कार नागपूर : बहुजन रंगभूमीतर्फे निर्मित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा ऐतिहासिक शंभरावा प्रयोग नुकताच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी प्रामुख्याने उपस्थित होते. वैदर्भीय रंगभूमीवर एखाद्या नाटकाचा शंभरावा प्रयोग होण्याचा इतिहासही यानिमित्ताने रचला गेला. वीरेंद्र गणवीर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक सातत्याने रंगभूमीवर सादर करण्यात आले. याप्रसंगी शंभर प्रयोगांचा टप्पा गाठल्याबद्दल नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हा प्रयोग स्त्रीच्या विविध भावनांचे प्रकटीकरण करणारा आहे. शेवंता ही स्त्री, प्रेयसी, पत्नी, माता म्हणून येणाऱ्या व्यथांचे प्रकटीकरण करणारी आहे. शेवंतावर गावातील सरपंचाची नजर असते. तिच्या संसारात विघ्न आणून वेगवेगळ्या प्रकारांनी तिचा नवरा मनोहर याला सरपंच हैराण करतो. दलित समाजातील भीमा विकलांग असतो आणि त्याची आई भीमा या संघर्षात भरडले जातात. विरोधातून प्रेमविवाह केलेल्या शेवंता आणि मनोहर यांची स्वाभाविक आपल्या अपत्याविषयी अनेक स्वप्न असतात पण मनोहरच्या नजरचुकीने अवघ्या सहा महिन्यांचा असताना भीमा पाळण्यातून खाली पडतो आणि विकलांग होतो. सरपंच मनोहरच्या संपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी त्याचा छळ करीत असतोच पण हा वाद विकोपाला जाऊन सरपंच मनोहरची हत्या करतो. त्यानंतर मात्र भीमा या घायाळ पाखराची वेदना सुरू होते. शेवंता मात्र भीमाला मोठे करण्याचे आणि त्याला खूप शिकविण्याचे स्वप्न पाहते. हा संघर्ष, भीमाला होणारी मारहाण, शाळेतील विद्यार्थ्यांकडून होणारा मानभंग आणि शेवंताची त्याला शिकविण्याची धडपड या प्रयोगात आहे. अखेर भीमाही या संघर्षाला तोंड देत मोठे होण्याची जिद्द बाळगतो आणि नाटक संपताना एक आशावाद पेरते. अतुल सोमकुंवर आणि प्रियंका तागडे यांनी या प्रयोगात अभिनयात जीव ओतला. या प्रयोगाला प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, नासुप्रचे सभापती हर्षदीप कांबळे, डॉ. नीलकांत कुलसंगे, नाटककार अमर रामटेके उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते सर्व नाट्यकलावंतांचा सत्कार करण्यात आला. ही चळवळ डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राबवित असल्याचे मत यावेळी वीरेंद्र गणवीर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
‘घायाळ पाखरा’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग
By admin | Published: October 27, 2014 12:29 AM