नागपूर : मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन जरीपटक्यातील डॉक्टरला खंडणी मागणारा आरोपी रविकांत खोब्रागडे याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. व्यवसाय बुडाल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले असले तरी यापूर्वी तो खंडणीसाठी माहिती अधिकार कायद्याचाही उपयोग करीत असल्याची बाब पुढे आली आहे. आरोपी खोब्रागडे विदर्भ नवनिर्माण सेनेचा स्वयंभू संस्थापक आहे. तो पत्नीच्या मदतीने कॅटरिंगचा व्यवसाय करीत होता. परंतु त्यात त्याला प्रचंड नुकसान सोसावे लागले. तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने नवीन शक्कल लढविली. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून तो लोकांना खंडणी मागू लागला. परंतु हा प्रकार फार काळ चालला नाही. आपल्या मुलाला उपचारासाठी तो डॉक्टरकडे जायचा. तेव्हा दवाखान्यात खूप गर्दी राहात होती. डॉक्टर शांत व सरळ मार्गी असल्याने आपण त्यांना सहजपणे फसवू शकू, याची त्याला खात्री होती. सुरुवातीला पोस्टाद्वारे त्याने पत्र पाठवून नऊ लाख रुपयांची मागणी केली. महिनाभर वाट पाहिली. पोलीस त्याच्यापर्यंत न पोहोचल्याने डॉक्टरने पोलिसात तक्रार केली नाही, असे समजून त्याने फोन करून १५ लाखांची मागणी केली. परंतु पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सच्या मदतीने त्याला पकडले. आरोपीला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खंडणीसाठी माहिती अधिकाराचाही वापर
By admin | Published: November 28, 2014 1:03 AM