नागपूर : वनविभागासोबत जुळलेल्या अशासकीय सदस्यांकडून होत असलेल्या राजमुद्रेच्या वापराची दखल अखेर वनविभागाने घेतली. तसेच राज्यातील काही राज्य वन्यजीव मंडळाचे अशासकीय सदस्य तसेच मानद वन्यजीव रक्षकांकडून असा प्रकार सुरू झाला होता. त्याबद्दल तक्रार झाल्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बलप्रमुख) यांच्या कार्यलयाने पत्र काढून दखल घेतली आहे.
शासनाची राजमुद्रा, वनविभागाचे बोधचिन्ह तसेच घोषवाक्यांचा वापर अलीकडे काही राज्य वन्यजीव मंडळ सदस्य, मानद वन्यजीव रक्षकांच्या लेटरहेडवर होत असल्याची तक्रार वनविभागाकडे काही आमदार आणि खासदारांनी केली होती. संवैधानिकदृष्ट्या हे चुकीचे असल्याने त्याचा दुरूपयोग होऊ शकतो, असे त्यांनी या तक्रारींमधून निदर्शनास आणले होते. त्यामुळे वनविभागाने या तक्रारींवर गंभीर दखल घेतली. २७ मे रोजी तशा आशयाचे पत्र काढून हा प्रकार अनुचित असल्याने याचा वापर न करण्यासंदर्भात कळविले आहे. यासोबतच, राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, कंपन्या, सहकारी संस्था यांनीही ही चिन्हे, घोषवाक्य वापरू नये, असेही स्पष्ट केले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निघाले आहे.