नागपूर : आहारात तृणधान्याचे महत्व अधिक आहे. ताकद आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तृणधान्य महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आहारात ज्वारी, बाजरीचा अधिक वापर करा, असे आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारिणी परिषद सदस्य डॉ. सी.डी. मायी यांनी केले.
भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्लीच्यावतीने आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष-२०२३ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. मिलिंद राठोड होते.
मायी म्हणाले, रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण, उच्च रक्तदाब यामुळे आज अनेकजण त्रस्त आहेत. बदललेला आहार आणि जीवनशैली याला कारणीभूत आहे.
डॉ. पंचभाई म्हणाले, तृणधान्यातील नैसर्गिक गुणधर्मामुळे शारीरिक कष्ट सहज साध्य व्हायचे, मात्र बदलत्या आहारामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्वारी, बाजरी, नागली, या सारख्या तृणधान्यांच्या विविध वाणांच्या संशोधनात कृषी विद्यापीठाचा वाटा मोठा आहे. त्यांचा आहारात समावेश अधिक करा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान आभासी पद्धतीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष-२०२३ उपक्रमासंदभरात ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. संचालन मिलिंद राठोड यांनी केले, तर आभार सहायक प्राध्यापक शिक्षण विस्तार डॉ. हर्षा मेंढे यांनी मानले.