नागपूर : १९९१ चे वर्ष होते़ चारदा खासदार राहिलेल्या माझ्या आईने म्हणजे प्रेमलाताई यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला व कराडला कोण उमेदवार द्यायचा हे ठरविण्याचा निर्णय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांच्यावर सोपविण्यात आला़ मुंबईवरून कराडला परतीच्या मार्गावर असताना मी आईसह पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये मुक्कामाला होतो़ उत्तरारात्री ३ वाजता फोन खणखणला़ पलिकडून स्वत: राजीव गांधी बोलत होते़ त्यांनी आईला फोनवर बोलावले आणि कराडवरून तुमचा उत्तराधिकारी म्हणून पृथ्वीराज लढेल, असे स्पष्ट सांगितले अन् इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेला मी राजकारणात आलो़, अशी माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली़ आधार संस्थेतर्फे आज शुक्रवारी साई सभागृहात आयोजित साक्षात...एक निखळ संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते़ संवादकर्ते एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांना खासगी आयुष्यापासून राजकाराणापर्यंत अनेक मुद्यांवर बोलते केले आणि चव्हाण यांनीही त्यांच्या प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरे दिली़ या संपूर्ण संवादादरम्यान कराडच्या नगरपालिकेच्या शाळेपासून तर बिट्स पिलानी व पुढे अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंतचा चव्हाणांचा प्रवास त्यांच्याही नजरेसमोरून पुन्हा एकदा तरळून गेला़ चव्हाण म्हणाले, राजकारण मला वारशातच मिळाले़ वडील आनंदराव चव्हाण व आई प्रेमलाताई दोघेही राजकारणात होते़ त्यामुळे राजकारण बालपणापासूनच जवळून अनुभवता आले़ याचा लाभ मला पुढे प्रत्यक्ष राजकारणात झाला़ राजीव गांधींच्या चाणाक्ष नजरेने माझ्यातील राजकीय व्यक्तीला हेरले़ परंतु मी पहिल्यांदा संसद गाठण्याआधीच त्यांची हत्या झाली, याची खंत मला आयुुष्यभर राहील, अशा शब्दात चव्हाण यांनी आपली वेदना व्यक्त केली़ राजकारणात आता खूप चिखल झाला आहे या चिखलात आपण कसे टिकलात, या प्रश्नाचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, राजाकरणातील सर्वच लोक वाईट नाहीत़ परंतु चांगली माणसे प्रकाशझोतात येत नसल्याने राजकारणाची प्रतिमा वाईट झाली आहे़ मी माझे स्वच्छ चारित्र्य जपू शकलो याचे संपूर्ण श्रेय माझ्यावर झालेल्या संस्कारांना जाते़, असे त्यांनी सांगितले़ खासगी आयुष्यात काय आवडते असे खांडेकरांनी विचारल्यावर चव्हाण म्हणाले, कॅलिओग्राफी, फोटोग्रॉफी, क्रिकेट या माझ्या आवडीच्या गोष्टी असून वाचनात मला खूप आनंद मिळतो़ परंतु मुख्यमंत्री असताना हे छंद जरा मागे पडले, अशी खंतीही त्यांनी व्यक्त केली़ काँग्रेसच्या राजकारणावर बोलताना सोनिया गांधींवर होणारा घराणेशाहीचा आरोप फेटाळून लावत राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हायला हवे होते. परंतु काँग्रेसचे राजकारण संपलेले नाही़ आताच्या केवळ बाता मारणाऱ्या सरकारला जनता कंटाळेल व काँग्रेस पुन्हा भरारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ केंद्रात पहिल्यांदा मंत्री होण्याची संधी कशी हुकली हे सांगताना एनकेपी साळवेंच्या बंगल्यावर सुरेश कलमाडी यांनी कशी कलाकारी केली होती, याचा रंजक किस्सा चव्हाणांनी सांगितला़ तेव्हा प्रेक्षकांममध्ये एकच हंसा पिकला़ यावेळी मंचावर हेमंत काळीकर व डॉ़ अविनाश रोडे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले़ (प्रतिनिधी)
उत्तररात्री उघडले राजकारणाचे दार
By admin | Published: December 13, 2014 3:06 AM