जितेंद्र ढवळे
नागपूर : हल्ली हायजिन फर्स्ट ! कोविडनंतर तर व्हायरस अन् बॅक्टेरियाची धास्ती अवघ्या जगानं घेतली. आपल्याला होणारे आजार साधारणत: बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे होतात. मात्र, आपण निरोगी वातावरणात राहिलो तर यापासून वाचूही शकतो. यासाठी बाजारात असलेले महागडे एअर प्युरिफायर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सामान्यांना परवडेल आणि ते मोकळा श्वास घेऊ शकेल असे ‘यूव्ही बेस एअर प्युरिफायर’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. संजय ढोबळे आणि अमृतसर येथील डॉ. विभा चोप्रा यांनी विकसित केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे.
नेमका उपयोग काय?
- आपल्याला घरी किंवा ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती भेटायला आली अथवा आपण कुणाकडे गेलो ती व्यक्ती आजारी आहे की निरोगी याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे त्या व्यक्तीला असलेल्या संसर्गाचा आपल्याला धोका अधिक असतो.- अशा आजारी व्यक्तीपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी किंवा संबंधित खोलीमधील व्हायरस आणि बॅक्टेरिया मारण्यासाठी यूव्ही बेस एअर प्युरिफायर महत्त्वाची भूमिका वठवितो.
काय आहे यूव्ही बेस एअर प्युरिफायर?
- ‘अल्ट्रा व्हायलेट-सी’ या लाइटचा उपयोग करून यूव्ही बेस एअर प्युरिफायर विकसित करण्यात आले आहे.- यात मशीनच्या वरच्या भागावर एक्झॉस्ट फॅन बसविण्यात आला आहे. या फॅनच्या माध्यमातून वातावरणातील (खोलीतील) धुळीचे कण, गंध आणि अगदी जंतूसुद्धा मशीनमध्ये ओढले जातात.- यानंतर मशीनच्या चार लेअरमध्ये बसविण्यात आलेले ‘अल्ट्रा व्हायलेट रे’ जंतूंचा नाश करतात. शिवाय मशीन प्रदूषित हवा फिल्टर करून खोलीतील हवा शुद्ध करते.- या मशीनच्या खालच्या भागात बॅक्टेरिया कलेक्शन ट्रे तयार करण्यात आला आहे. तो बाहेर काढून नियमित स्वच्छही केला जाऊ शकतो.
कोविडनंतर सॅनिटायझेन आणि सोशल डिस्टसिंग हे शब्द सामान्य नागरिकांच्या अंग वळणी पडले. स्वच्छता प्रत्येकालाच हवी असते. याशिवाय निरोगी जीवन जगण्यासाठी शुद्ध हवा महत्त्वाची असते. त्यामुळे ‘यूव्ही बेस एअर प्युरिफायर’ तयार करण्यात संकल्प होता. तो यशस्वीही झाला. नव उद्योजकांनी हे संशोधन लोकाभिमुख करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- प्रा. डॉ. संजय ढोबळे, भौतिकशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर