नागपूर : जिल्ह्यातही २ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी १८ केंद्रे जिल्ह्यात तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात १,३८५ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केले आहे. तर ४५ ते ६० वयाच्या दरम्यानचे कोमार्बिड असलेल्या २२२ रुग्णांनी लस घेतली आहे. विशेष म्हणजे काही केंद्रांवर लसीकरणाला अतिशय अत्यल्प प्रतिसाद आहे.
शहरातील लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या असल्या तरी, ग्रामीण भागात लसीकरण आरामात सुरू आहे. काटोल, सावनेर तालुक्यातील ज्येष्ठांचा लसीकरणासाठी जास्त प्रतिसाद दिसत आहे. या दोन्ही तालुक्यांतील केंद्रांवर बुधवारी दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त ज्येष्ठांनी लसीकरण करून घेतले आहे. बुधवारी ९३२ ज्येष्ठांनी लसीकरण केले असून, यातील व्याहाड प्राथमिक केंद्रात ५, बोरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ८, गोंडखैरी प्रा. आ. केंद्रात १२, कुही ग्रामीण रुग्णालयात ६, मौदा ग्रामीण रुग्णालयात १०, पारशिवनीत ९ ज्येष्ठांनी लसीकरण केले आहे. ४५ ते ६० वयोगटातील कोमार्बिड असलेल्या १६३ रुग्णांनी बुधवारी लसीकरण केले.