नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होऊन आठ दिवसांचा कालावधी झाला आहे; परंतु कमी दिवसांतच ६० वर्षांवरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासकीय व खासगी केंद्र मिळून या दोन गटांतील १९८०५ लाभार्थ्यांनी लस घेतली. विशेष म्हणजे, शासकीय केंद्र सुरू होऊन ८ दिवसांचा कालावधी होत असताना १४ केंद्रांवर ५५४६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले, तर ६ दिवसांचा कालावधीत ४१ खासगी केंद्रांवर १४२५ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.
नागपूर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’, तर दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंट लाइन वर्कर’ तर आता तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ व २० विविध प्रकारचे गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवसापासून ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीचे चार दिवस १४ शासकीय केंद्रांवर दोन्ही गटांचे लसीकरण सुरू होते; परंतु सर्वच केंद्रांवर होत असलेली गर्दी, यातच सोयींचा अभाव यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. शिवाय वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीतीही वर्तवली जात होती. याची दखल घेत मनपा आयुक्तांनी ३ मार्चपासून ५ खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू केले. पहिल्याच दिवशी ४५ वर्षांवरील १२७ तर ६० वर्षावरील ५०० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सध्या खासगी केंद्र वाढवून ४१ करण्यात आले आहेत. शिवाय, सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत केंद्र सुरू ठेवण्यात येऊ लागल्याने गर्दी कमी होऊन विशेषत: ज्येष्ठांच्या सोयींचे झाले आहे.
- ८ दिवसांत १४,१३८ ज्येष्ठांना लस
मागील ८ दिवसांत शासकीय केंद्रांवर ३४३७ तर खासगी केंद्रांवर १०७०१ असे एकूण १४, १३८ ज्येष्ठांनी लस घेतली. ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या २१०९ लाभार्थ्यांना शासकीय केंद्रांवर तर ३५५८ लाभार्थ्यांना खासगी केंद्रांवर असे एकूण ५६६७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीकरणानंतर कोणालाच आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-६० वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण (८ मार्चपर्यंत)
शासकीय केंद्र : ३४३७
खासगी केंद्र : १०७०१
-४५ वर्षांवरील गंभीर आजारी लाभार्थ्यांचे लसीकरण (८ मार्चपर्यंत)
शासकीय केंद्र : २१०९
खासगी केंद्र : ३५५८