नागपूर : कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सोमवारपासून तृतीयपंथी समुदायासह विकलांग, बेघर नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दोन केंद्रांवर १८३ तृतीयपंथीयांचे लसीकरण करण्यात आले.
महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने तृतीयपंथी, विकलांग व बेघर नागरिकांचे लसीकरण हाती घेण्यात आले. खरबी चौकातील बेटियाँ शक्ती फाउंडेशन सभागृहामधील लसीकरण केंद्राचा शुभारंभ विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते झाला. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सहाय्यक पोलीस आयुक्त रेखा भवरे, किन्नर समुदायाच्या कल्याणी नायक उपस्थित होत्या. लसीकरणानंतरही प्रत्येकाने मास्क लावणे, नियमित हात धुणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी केले.
व्हेरॉयटी चौकातील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात स्थित सारथी ट्रस्टच्या कार्यालयातील लसीकरण केंद्रावरही तृतीयपंथी समुदायासह विकलांग, बेघर नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समाज कल्याण तालुका समन्वयक राजेंद्र अवधूत, सारथी ट्रस्टचे अध्यक्ष आनंद चांदराणी, सीईओ निकुंज जोशी, प्रकल्प समन्वयक अमित नगरारे, सामजिक कार्यकर्ता विद्या कांबळे, आचल वर्मा उपस्थित होते.