नागपूर : पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर कोरोनाचा विशेष प्रभाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मंगळवारी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एका दिवसात तब्बल २२ हजार महिलांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात ३३० केंद्रांवर राबविण्यात आलेल्या मोहिमेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत २२ हजार २३० महिलांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या मोहिमेतील एक मोठा टप्पा पार पाडण्यात आला. नागपूर शहरातील १६६ लसीकरण केंद्रांचा समावेश होता. महापालिका क्षेत्रात १२ हजार ३६३ व ग्रामीण भागात ९ हजार ८६७ महिलांचे लसीकरण करण्यात आले.
महिलांमध्ये गरोदर माता व महिला,युवती यांचा लसीकरण मोहिमेला विशेष प्रतिसाद दिसून आला.
यांचे झाले लसीकरण
- या मोहिमेत घरात काम करणाऱ्या महिला, शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला, मजूर, कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. जिल्हाभरातील महिला बचत गट, महिला संघटना, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला संघटक, सर्व महिलांनी या मोहिमेत हिरीरीने भाग घेतला.
जिल्ह्यात १६ लाख ४३ हजार महिलांचे लसीकरण
- जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४८ हजार नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या २४ लाख ८३ हजार तर, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ९ लाख ६४ हजार एवढी आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १६ लाख ४३ हजार महिलांचे, तर १८ लाख ३ हजार पुरुषांचे लसीकरण झालेले आहे. नागपूर शहरात १९ सप्टेंबरपर्यंत १९ लाख ११ हजार लोकांचे लसीकरण झालेले आहे. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १३ लाख १३ हजार तर, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५ लाख लक्ष ९७ हजार एवढी आहे.