लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण अत्यंत आवश्यक असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये लसीकरणाचे महत्त्व घरोघरी पोहचविण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे २५,५४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना कोविडवरील लस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करुन लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी २५,५४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी या वयोगटातील १३,०९३ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यासोबतच ४५ ते ६० व त्यावरील या वयोगटातील १५,५३८ नागरिकांना पहिला डोस तर १०,०६० नागरिकांना दुसरा डोस देऊन जिल्ह्यात एकाच दिवशी लसीकरणाचा उच्चांक केला आहे. जिल्ह्यातील आदिवासी व अति दुर्गम भागातील नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गुरुवारी दिली.
तालुकानिहाय झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण नागपूर ग्रामीणमध्ये २,९७५ नागरिकांचे करण्यात आले. सावनेर २,६४३, हिंगणा २,४७०, कामठी २२०९, कळमेश्वर २,१४६, पारशिवनी २०३९, उमरेड १,८८०, मौदा १,८३४, काटोल १,७३०, भिवापूर १,१११, रामटेक १,७३०, नरखेड १,५४१ तर कुही तालुक्यात १,२९१ नागरिकांना एकाच दिवशी लस देण्यात आली आहे.
- जिल्ह्यात ७ लक्ष २८ हजार नागरिकांचे लसीकरण
लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख २७ हजार ७५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ५ लाख ८६ हजार ५६० नागरिकांनी घेतला आहे. दुसरा डोस १ लाख ४१ हजार १९८ नागरिकांनी घेतला आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ७० टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.