लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला वेग यावा म्हणून प्रशासनाच्या वतीने सर्व पातळीवर अविरत प्रयत्न केले जात आहेत. त्यातच कुही तालुक्यात शनिवारी (दि. ८) एकूण ५६४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण माेहिमेला तालुक्यातील परसोडी (राजा) या गावात उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती तहसीलदार बी. एन. तीनघसे व तालुका आराेग्य अधिकारी डॉ. राजेश गिलानी यांनी संयुक्तरीत्या दिली.
लसीकरण माेहिमेला आणखी वेग यावा म्हणून तालुक्यात ‘गाव तेथे लसीकरण’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शनिवारी तालुक्यातील ४५ वर्षांवरील ५६४ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करवून घेतले. यात कुही शहरातील ग्रामीण रुग्णालयातील ४८ नागरिकांसह तालुक्यातील मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रातील ३१, वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील ५९, साळवा प्राथमिक आराेग्य केंद्रातील १०, तितूर येथील ६८, सावळी २७, मुसळगाव ४, तारणा ८८, कटारा ३१, कुजबा येथील ६७ तर परसोडी (राजा) येथील १२० नागरिकांचा समावेश आहे.
ही माेहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी तहसीलदार बी. एन. तीनघसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गिलानी, खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. रचना नागदेवे, डॉ. महेंद्र रामटेके, डॉ. नरेंद्र पटले, डॉ. गजबे, नायब तहसीलदार रमेश पागोटे, प्रकाश हारगुडे, वामन पंचबुद्धे, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, अधीक्षक देवाजी सेडमेक, सुहास मिसाळ यांच्यासह आराेग्य विभागातील कर्मचारी प्रयत्नरत आहेत. १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू हाेण्यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील लाेकप्रतिनिधींनी केले आहे.