रामटेक : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. ४) नाेंदणीकृत एकूण ७८ ज्येष्ठ नागरिकांना काेराेेना लस देण्यात आली. लस घेणाऱ्यांमध्ये संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांचाही समावेश आहे. चार दिवसांत रामटेक शहरातील एकूण २५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांनी दिली.
शासनाच्या आदेशान्वये रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या काेराेना लसीकरणाला साेमवार (दि. १)पासून सुरुवात करण्यात आली. आराेग्य विभागाच्या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लस घेण्यासाठी ॲपवर नाेंदणी केली. ज्येष्ठांना लस घेण्यासाठी रुग्णालयात तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचा त्रास कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने नाेंदणीकृत नागरिकांना टाेकण देऊन विशिष्ट वेळी बाेलवायला सुरुवात केली. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी कमी झाली असून, नागरिकांचा त्रास कमी झाला. गुरुवारी ६० वर्षांवरील ६८ तर ४५ वर्षांवरील १० नागरिकांना काेराेना लस देण्यात आली, अशी माहिती डाॅ. प्रकाश उजगरे यांनी दिली. दुसरीकडे, काेराेनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने काेराेना लस घ्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखडे यांनी केले.