लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. यामुळे कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांना इतर आजार आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात ६० वर्षांवरील ६,६७,१५८ ज्येष्ठ नागरिक आहेत. परंतु नागपुरात ‘को-विन’ अॅपचे अपग्रेडेशन सुरू आहे. यामुळे १ मार्चपासून नोंदणी सुरू होणार किंवा नाही, यावर अधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३१ हजार हेल्थ वर्कर तर दुसऱ्या टप्प्यात १५ हजार फ्रंट लाइन वर्करचे लसीकरण सुरू आहे. १३ फेब्रुवारीपासून दुसऱ्या डोसला सुरुवातही झाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठांना सरकारी केंद्रांवर आणि खासगी हॉस्पिटलमध्ये लस दिली जाणार आहे. परंतु या संदर्भात अद्यापही मार्गदर्शक तत्त्वे आली नसल्याने मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले, ‘को-विन’ अॅपचे अपग्रेडेशन सुरू आहे. यामुळे ते बंद आहे. मात्र, शनिवारी केंद्राच्या आरोग्य विभागाने ऑनलाइन कार्यशाळेत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती दिली आहे. रविवारी किंवा सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे येताच नोंदणी व लसीकरणाला सुरुवात होईल.
स्वत:ला नोंदणी करावी लागेल
उपलब्ध माहितीनुसार, १ मार्चपासून ‘को-विन’ अॅप आणि सॉफ्टवेअर सामान्य जनतेसाठी खुले होणार आहे. आरोग्य सेतू अॅपद्वारे ‘को-विन’ वेबसाइटवर लस घेण्यासाठी स्वत:ला नोंदणी करावी लागणार आहे.
वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही
‘को-विन’ किंवा ‘आरोग्य सेतू’ हे वेगळे अॅप डाऊनलोड करण्याचीही गरज नसणार. जर हे मोबाइल अॅप्लिकेशन्स नसतील तर तुम्ही थेट ‘कोविन डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाइटवर जाऊन लसीकरणासाठी तुमच्या अथवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या नावांची नोंदणी करू शकणार आहात.
माहिती भरावी लागेल
नोंदणी करताना या वेबसाइटवर काही माहिती भरावी लागेल. यात नाव, वय, लिंग आदींचा समावेश असेल.
४५ ते ६० वयोगटातील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज
४५ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत त्यांना नोंदणीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज असेल.
को-मॉर्बिडिटीज आजारांचा समावेश
गंभीर आजारांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड आणि फुप्फुसांशी संबंधित २० गंभीर आजारांचा (को-मॉर्बिडिटीज) समावेश आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आधारकार्ड
६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना नोंदणीसाठी केवळ आधारकार्ड पुरेसे असणार आहे. ते नसल्यास मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट, पॅनकार्ड आदी ग्राह्य धरले जाणार आहे.
कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन याचा पर्याय नसणार
प्राप्त माहितीनुसार, नोंदणी केल्यानंतर ज्या लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागणार आहे.
खासगी रुग्णालयातील लसीकरणाबाबत संभ्रम
शासकीय लसीकरण केंद्रावर नि:शुल्क तर खासगी रुग्णालयातील केंद्रावर शुल्क आकारून लस दिली जाणार आहे. तूर्तास शुल्क किती हे ठरायचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार, लसीच्या एका डोससाठी २५० आणि दोन डोससाठी ५०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
लसीकरण केंद्रावरही नोंदणीची सोय
लसीकरण केंद्रावरही नोंदणीची सोय असणार आहे. नोंदणी करताना तुम्ही तुमच्या सोयीचे केंद्र व वेळ निवडण्याची मुभा असणार आहे.
२८ दिवसांनी दुसरा डोस
ज्यांना पहिला डोस मिळेल त्यांना मोबाइल अॅपद्वारे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येईल.