खापरखेडा : परिसरातील प्राथमिक आराेग्य केंद्र चिचाेली येथे मंगळवारी (दि.२१) महिलांकरिता विशेष लसीकरण माेहीम राबविण्यात आली. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार महिला लसीकरणाचा दिवस म्हणून आयाेजित या शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम डाेस घेणाऱ्या महिलेचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वत्र पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शासनाच्या आदेशान्वये महिलांना महत्त्व देऊन विशेष-डे अंतर्गत महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी ही विशेष माेहीम असल्याचे सांगण्यात आले. चिचाेली प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत चिचाेली, उपकेंद्र सुरादेवी, वलनी वेकाेलि दवाखाना, खापरखेडा वीज केंद्र दवाखाना आदी केंद्रावर ही माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेत घरकाम करणाऱ्या महिला, मजूर, कामगार व गृहिणींनी सहभाग घेतला.
शासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययाेजनेत काेविड लस उपयुक्त ठरली असून, बाधितांच्या वाढत्या संख्येवर लसीकरणामुळे ब्रेकसुद्धा लागला आहे. त्यामुळे महिला स्वत: सुरक्षित हाेतील आणि कुटुंब, समाजसुद्धा सुरक्षित राहील तसेच काेणतीही महिला लसीकरणापासून दूर राहू नये या उद्देशाने ही माेहीम राबविली गेली. प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री पेटकर यांच्या मार्गदर्शनात औषधी संयाेजक लांजेवार, संगणक ऑपरेटर उज्ज्वला नागदवणे, आराेग्यसेविका नाईक, शिक्षिका उज्ज्वला पजई, शिक्षक प्रदीप कामडी, प्रशांत नागदवणे, सुरेश वंजारी आणि आराेग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी सहकार्य दिले.