नागरिकांच्या लसीकरणासाठी चकरा : केंद्र बंद ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना तंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले जात आहे. दुसरीकडे नागरिकांच्या मागणीनुसार पन्नासेक ले-आउट येथील समाजभवनात महापालिका प्रशासनाने सुरू केलेले लसीकरण केंद्र सोमवारी अचानक बंद करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
रविवारी या केंद्रावर ३२० नागरिकांना लस देण्यात आली. सोमवारी लसीचा मर्यादित साठा असल्याने मनपा प्रशासनाने फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोमवारी सकाळी नागरिक लसीकरणासाठी या केंद्रावर पोहोचले, परंतु केंद्र बंद असल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस न घेता परतावे लागले.
१६ जून रोजी पन्नासेक ले-आउट येथील समाजभवनात लसीकरण केंद्र सुरू करण्याला मनपा प्रशासनाने मंजुरी दिली. या परिसरात जवळपास दुसरे केंद्र नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ११ जुलैला केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु, लसीकरण केंद्र सुरू झाल्याची माहिती मिळताच एका नगरसेविकेने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना केंद्र तत्काळ बंद करण्याची सूचना केली. सोमवारी या केंद्रासाठी मिळालेल्या लसी दुसऱ्या केंद्रावर पळविल्या. केंद्र सुरू करू नका, अशी अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचे नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी तक्रार करून लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याची मागणी केली.
......
लोकांची सुविधा की नेत्यांची मर्जी!
शहरातील नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी शहराच्या विविध भागांत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. पन्नासेक ले-आउट परिसरात केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांच्या मागणीनुसार येथील समाजभवनात केंद्र सुरू करण्याला मनपा प्रशासनाने परवानगी दिली. परंतु यामुळे नाराज झालेल्या नगरसेविकेने अधिकाऱ्यांना तंबी देत केंद्र बंद करण्याची सूचना केली. यामुळे शहरातील लसीकरण केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी की नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी चालविली जात आहे. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.