लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नागपुरात सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम गेल्या पंधरवड्यापासून संथ सुरू आहे. अनेक केंद्रांवर रडतखडत लसीकरण सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत साठा उपलब्ध न झाल्यास काही केंद्रांवरील मोहीम ठप्प पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी ९४५३ लाभार्थींना लस देण्यात आली. यात ४१०५ जणांनी पहिला, तर ५३४८ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला.
केंद्र सरकारने ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांसाठी लसीकरणास परवानगी देताच एप्रिल महिन्यात अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू केले जाणार असल्याने मागणी वाढेल आणि गर्दीतही भर पडेल, या भीतीने ४५ वर्षांपुढील अनेकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घ्यायचा असल्याने अशांचीही या गर्दीत भर पडत आहेत. असे असले तरी, लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने नागपुरातील लसीकरण कसेबसे सुरू आहे. एक-दोन दिवसात लस उपलब्ध होईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी. यांनी दिली.
११ एप्रिलच्या सुमारास दिवसाला १५ ते १६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण कधी ७, तर कधी ९ हजारांवर आले आहे. महापालिका क्षेत्रात १२८ शासकीय व खासगी केंद्रे आहेत. या केंद्रांवर दुसऱ्या दिवशी लसीचा पुरवठा करू शकतो अथवा नाही, हे अनेकदा सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट नसते. गुरुवारी सायंकाळी फक्त तीन ते साडेतीन हजार डोस शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर शहरातील लसीकरण (२९ एप्रिलपर्यंत)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४२८६१
फ्रंटलाइन वर्कर - ४५४२८
४५ वर्षांवरील - ९८१५९
४५ वर्षांवरील आजारी - ७४४९0
६० वर्षांवरील - १,५८,६१९
एकूण - ४,१३,९६९
दुसरा डोस
आरोग्यसेवक - १९,६८३
फ्रंटलाइन वर्कर - ११,९९७
४५ वर्षांवरील - ९१४३
४५ वर्षांवरील आजारी - ८५०८
६० वर्षांवरील - ३८२८४
दुसरा डोस एकूण - ८७६१५
एकूण लसीकरण - ५०७१७२