नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीबाबत सुरुवातीला अनेक गैरसमज होते. परिणामी, दरदिवशी दिलेल्या लसीकरणाच्या लक्ष्यापैकी ४० टक्क्यावर लसीकरण जात नव्हते. परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढताच पहिल्या डोजचेच नव्हे तर दुसऱ्या डोजचे म्हणजे बूस्टर डोजचे लसीकरण वाढले. लसीकरणासाठी आतापर्यंत ४६ हजार लाभार्थ्यांची नोंद झाली असून, यातील २६ हजार १०१ लाभार्थ्यांनी लस घेतली. याचे प्रमाण ५६ टक्के आहे. लसीकरणासाठी सकाळच्या वेळी गर्दी होत असली तरी दुपारनंतर केंद्रावर शुकशुकाट राहत असल्याचे चित्र आहे.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शहर व ग्रामीण मिळून सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे १ लाख २९ हजार तर भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे ५ हजार २०० डोज असे एकूण १ लाख ३४ हजार २०० डोज मिळाले. सुरुवातीला या दोन्ही लसीबाबत गैरसमज होते. विशेषत: कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू असल्याने व ज्या लाभार्थ्यांना ही लस दिली जात होती त्यांच्याकडून संमती पत्र लिहून घेतले जात असल्याने डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाने वेग धरताच लसीकरणाच्या टक्क्यातही वाढ झाली.
- ३१ हजार हेल्थ वर्कर तर १५ हजार फ्रंट लाईन वर्करची नोंद
मनपा प्रशासनाकडून ‘को-विन’ अॅपवर नोंद झालेल्या ‘हेल्थ वर्कर’ व ‘फ्रंट लाईन वर्कर’ यांनाच लस दिली जात आहे. तसा मॅसेज संबंधित लाभार्थ्यांना येतो. यात लसीकरण केंद्राचे नाव, लस घेण्याची तारीख व वेळ दिली असते. यामुळे केंद्रावर गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. लसीकरणानंतर तपासणीसाठी स्वत:हून लाभार्थी थांबनूही असतात. केंद्राचे डॉक्टर त्याकडे लक्ष देतात. सध्या अॅपवर - ३१ हजार ‘हेल्थ वर्कर’ तर १५ हजार ‘फ्रंट लाईन वर्कर’ची नोंद झाली आहे.
- शहरात आज १४६२ लाभार्थ्यांचे लसीकरण
शहरात आज २० केंद्रांवर प्रत्येकी १०० प्रमाणे २००० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार १४६२ लाभ्यार्थ्यांनी लस घेतली. त्यानुसार ७३.१ टक्के लसीकरण झाले. सर्वाधिक लसीकरण किंग्जवे या खासगी हॉस्पिटलमधील केंद्रावर झाले.
- केंद्रावरील लसीकरणाची स्थिती
केंद्र लाभार्थ्यांचे लसीकरण
मेयो रुग्णालय ३६
एम्स ६१
डागा रुग्णालय १०८
आयसोलेशन हॉस्पिटल ९२
ऑरेंज सिटी हॉस्पिटल ४०
म्युर मेमोरियल हॉस्पिटल ११२
पीएमएच हॉस्पिटल ४४
इंदिरा गांधी रुग्णालय ५६
पोलीस हॉस्पिटल १८६
सीम्स हॉस्पिटल ४३
दंदे हॉस्पिटल ७१
ईएसआयएस हॉस्पिटल ८०
अॅलेक्सिस हॉस्पिटल ६०
भवानी हॉस्पिटल ७१
पीएमएच हॉस्पिटल ४९
जाफरी हॉस्पिटल ४३
वोक्हार्ट हॉस्पिटल ५२
किंग्जवे हॉस्पिटल १९६
क्युर हॉस्पिटल १८
मेडिकल हॉस्पिटल ४४
- लसीकरणाचा आणखी वेग वाढणार
सुरुवातीला लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काही गैरसमज होते. नंतर ते दूर होताच लसीकरण वाढले. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर, पोलीस यांना लस दिली जात आहे. काही केंद्रावर तर १०० टक्के लसीकरण होत आहे.
-डॉ. संजय चिलकर
आरोग्य अधिकारी, मनपा