लेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लसीकरणाच्या भराेशावर कोरोनावर मात करण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकार करीत आहे. परंतु नागपूर शहरात लसीचा साठाच संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरात ४० ते ५० टक्के केंद्रांवर फार कमी प्रमाणावर लसीकरण झाले. सुत्रांनुसार मनपाकडील लसीचा साठा संपलेला आहे. लसीच्या पुरवठ्यासाठी ते आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे
लक्ष ठेवून आहेत. गुरुवारपर्यंत नागपूर महापालिकेकडे केवळ तीन ते साडेतीन हजार लसीचे डोस उपलब्ध होते. त्यामुळे शुक्रवारी अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अशी परिस्थिती असूनही नागपुरात १ मेपासून १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या लोकांचे लसीकरण करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी तीन केंद्र बनवण्यात आली आहेत. ही केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, पाचपावली महिला रुग्णालय आणि आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा अशी आहेत. विशेष म्हणजे १८ वर्षांवरील लोकांना देण्यात येणाऱ्या लसीचे डोस अजूनपर्यंत मनपाला मिळालेले नाहीत. असे सांगितले जाते की, शनिवारी सकाळी तिन्ही केंद्रांना हे डोस उपलब्ध करून दिले जातील. १ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळात संबंधित वयातील लोकांना लस टोचली जाईल. त्यानंतर दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात लसीकरण होईल.
बॉक्स
अधिकाऱ्यांचे मौन
मनपाच्या अधिकाऱ्यांकडे लसीच्या साठ्याबद्दल विचारणा करण्यासाठी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. फोनसुद्धा उचलला नाही. मोबाईलवर मेसेज पाठविल्यानंतरसुद्धा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनीसुद्धा प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आऊट ऑफ कवरेज होते. यावरून हे स्पष्ट होे की, मनपाकडे असलेला साठा संपला आहे. परंतु कुणी बोलायला तयार नाही, असे असूनही १८ वर्षांवरील लसीकरणाची तयारी सुरु असून, महापौर व मनपा आयुक्तांनी तरुणांना लस लावून घेण्याचे आवाहन केले आहे.
बॉक्स
रजिस्ट्रेशनमध्ये येताहेत अडचणी
१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणाला १ मेपासून सुरुवात होत आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. काही दिवसांपासून रजिस्ट्रेशन सुरु आहे. परंतु कोविड ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास अडचणी येत आहेत.
बॉक्स
लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत : महापौर
यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. लस किती आहे, हे तर अधिकारीच सांगू शकतील. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण शनिवारपासून सुरु होत आहे. त्यांच्यासाठी लस उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.