लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मनपाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाने पाच खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी शासन निर्धारित शुल्क २५० रुपये भरून लस घेता येईल. सीताबर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालय, सक्करदरा येथील मोघरे चाईल्ड हॉस्पिटल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयामध्ये लसीकरणाची सुरुवात झाली. बुधवारपासून सक्करदरा येथील गिल्लूरकर रुग्णालय तसेच रवीनगर येथे सेनगुप्ता रुग्णालयात शासन निर्धारित शुल्क भरून लसीकरण करण्यात येईल. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारपासून शासकीय रुग्णालयात १०० नागरिकांना टोकन दिले जाणार आहे. त्यानंतर येणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जाईल. सध्या सगळ्या केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. लसीकरण कार्यक्रम सुरू राहणार आहे. नागरिकांनी गर्दी न करता लस घेण्याची गरज असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.
....
शासकीय केंद्रांची नावे
पाचपावली येथे दोन केंद्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय - दोन केंद्रे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय - दोन केंद्रे, झिंगाबाई टाकळी येथील पोलीस रुग्णालय, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल, एम्स, ईएसआयएस हॉस्पिटल या केंद्रांवर जाऊनही ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. ही शासकीय केंद्रे लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील.
...
काय सोबत असावे?
ज्यांना लस घ्यावयाची त्यांनी लसीकरण केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे. आधार कार्ड नसेल तर ज्या ओळखपत्रावर जन्मतारीख असेल असे ओळखपत्रही नोंदणी ठिकाणी दाखवून नोंदणी करता येईल. जे फ्रंटलाइन वर्कर आहेत त्यांनी त्यांच्या नोकरीतील ओळखपत्र आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या रुग्णालयाचे ओळखपत्र दाखवून नोंदणी करवून घ्यावी. प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल; तसेच कोविन अथवा आरोग्य सेतू या ॲपद्वारेही ऑनलाइन नोंदणी करता येईल.