सुनील चरपे
लाेकमत नेटवर्क
नागपूर : ‘आला पावसाळा, जनावरे सांभाळा’ असे पशुपालकांचे नियाेजन असते. पावसाळ्यात गुरांना साथीच्या आजाराची लागण हाेऊ नये, यासाठी त्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक असते. लसींसाठी बहुतांश पशुपालकांना शासनाच्या पशुसंवर्धन विभागावर आणि या विभागाला राज्य शासनावर अवलंबून राहावे लागते. शासनाकडून लसींचा साठा पुरविण्यात दिरंगाई हाेत असल्याने लसीकरणालाही विलंब हाेताे आणि पशुपालकांचे नियाेजन बिघडते. असा काहीसा प्रकार नागपूर जिल्ह्यात सुरू असून, यात काेराेना संक्रमणाने भर घातली आहे.
नागपूर जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांसह गुरांची एकूण संख्या ११ लाख १७ हजार ८६६ च्या आसपास आहे. गुरांना ताेंडखुरी, पायखुरी, फऱ्या, घटसर्प, कासदाह, थायलेरियाॅसिस, तिवा, पाेटफुगी, हगवण, लिव्हर फ्ल्यूक यांसह साथीच्या व इतर आजारांपासून वाचविणे आवश्यक असल्याने त्यांचे नियमित लसीकरण करणे क्रमप्राप्त असते. गुरांना सहसा विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार जडतात. गुरांना विषाणूजन्य आजारापासून वाचविण्यासाठी वर्षातून दाेनदा (सहा महिन्यांच्या अंतराने) तर जीवाणूजन्य आजारापासून वाचविण्यासाठी वर्षातून एकदा लसीकरण केले जाते. त्यासाठी शासनाकडे १३ वेगवेगळ्या आजारांच्या लसींची मागणी नाेंदविली जाते.
जिल्ह्यातील कळमेश्वर, काटाेल, नरखेड, हिंगणा, रामटेक तालुक्यांतील गुरांचे नियमित लसीकरण केले जात असल्याची माहिती या तालुक्यातील पशुपालकांनी दिली असून, सावनेर, पारशिवनी, माैदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर (ग्रामीण) या तालुक्यांमध्ये लसीकरणात थाेडी अनियमितता हाेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हत्तीसरा (ता. सावनेर) येथील शेतकऱ्याच्या बैलाचा घटसर्पाने मृत्यू झाला. याची माहिती प्रशासनाला दिली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, अशी माहिती रामेश्वर चाके (रा. हत्तीसरा) यांनी दिली. सावनेर तालुक्यात दाेन वर्षापासून लसीकरण करण्यात आले नाही, असेही बाेरुजवाडा येथील अशाेक निंबाळकर व अन्य पशुपालकांनी दिली.
मध्यंतरी जिल्ह्यात गुरांना ‘लम्पी स्किन डिसिज’ या संसर्गजन्य राेगाची माेठ्या प्रमाणात लागण झाली हाेती. त्यावेळी शासकीय पशुवैद्यकीय यंत्रणा गुरांवर उपचार करण्यास ताेकडी पडल्याने काही शेतकऱ्यांना खासगी डाॅक्टरांकडून उपचार करवून घ्यावे लागले हाेते. ग्रामीण भागात खासगी पशुचिकित्सकांची माेठी कमतरता आहे. त्यामुळे त्यांची मदत घ्यावयाची असल्यास शेतकऱ्यांनी त्यांची गुरे तालुक्याच्या ठिकाणी अथवा तालुक्यातील माेठ्या गावांमध्ये न्यावी लागतात. या बाबी त्रासदायक असल्याने आपल्याला शासकीय यंत्रणेवर अवलंंबून राहावे लागत असल्याची प्रतिक्रिया अनेक पशुुपालकांनी व्यक्त केली.
...
जिल्ह्यातील जनावरांची संख्या अ - शेळ्या व मेंढ्या - ७,४८,५८७
ब - देशी गाई - २,५५,९९२
क - संकरित गाई - ५९,९७८
ड - म्हशी - ५३,३१२
...
कोणकोणत्या दिल्या जातात लस?
अ - लाळ्या खुरकुत (ताेंडखुरी, पायखुरी)
ब - फऱ्या
क - घटसर्प
ड - ॲथ्रेक्स
ई - ब्रुराेल्लाेसिस
...
नोव्हेंबर हुकला, आता काय होणार?
गुरांना काही लसी वर्षातून दाेनदा तर काही एकदा दिल्या जातात. वर्षातून दाेनदा दिल्या जाणाऱ्या लसी या सहसा फेब्रुवारी-मार्च व नाेव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर वर्षातून एकदा दिली जाणारी लस ही पावसाळ्यापूर्वी दिली जाते. दीड वर्षापासून काेराेना संक्रमण सुरू असल्याने सन २०२० च्या पावसाळ्यापूर्वी तसेच फेब्रुवारी व नाेव्हेंबरमध्ये जिल्ह्यात गुरांची लसीकरण माेहीम राबविण्यात आली नाही. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने राज्य शासनाकडे लसींची मागणी नाेंदविली आहे. त्या लसींचा साठा जेव्हा प्राप्त हाेईल, त्यानंतर या माेहिमेला सुरुवात केली जाईल. हा साठा मिळण्यास जेवढी दिरंगाई हाेईल, लसीकरण तेवढे लांबणीवर जाईल.
...
जिल्ह्यातील गुरांच्या लसीकरणाची माेहीम हाती घेण्यात आली आहे. राज्य शासनाकडे गुरांच्या विविध आजारांच्या १३ लसींची मागणी नाेंदविण्यात आली आहे. काेराेना संक्रमणामुळे या लसींचा साठा उपलब्ध हाेण्यास थाेडी दिरंगाई हाेत आहे. साठा उपलब्ध झाल्याबराेबर गुरांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाईल.
- उमेश हिरुळकर,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नागपूर.
...
माझ्याकडे १५ गाई आणि १२ म्हशी आहेत. माझ्या सर्व जनावरांचे नियमित लसीकरण केले जाते. यावर्षी सर्व गुरांना खुरीचे दाेन डाेस देण्यात आले असून, घटसर्प व इतर आजारांचे लसीकरण व्हायचे आहे.
- गुणवंत अतकरी,
गाेंडखैरी, ता. कळमेश्वर.
...
आपल्याकडे ४७ जनावरे आहेत. या सर्व जनावरांचे आपण शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून नियमित लसीकरण करवून घेताे. दाेन वर्षांपूर्वी पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने समस्या निर्माण झाली हाेती.
- सारंग काठाेके,
महादुला, ता. रामटेक.
...