नागपूर : केंद्राने नवे धोरण जाहीर करीत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यानुसार मागील ३० दिवसात या वयोगटातील ५,२०,६८८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. तब्बल २२६ टक्क्याने लसीकरण वाढले. परंतु या वयोगटातील लोकसंख्या पाहता आतापर्यंत केवळ २६.८७ टक्केच लोकांचे लसीकरण झाले. यामुळे नागपूर जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासाठी कोणता दिवस उजाडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत अपुऱ्या वैद्यकीय सोयींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली. रुग्णालयातील बेड, औषधे, ऑक्सिजन, डॉक्टर, कर्मचारी कमी पडल्याने वेळेत उपचारापासून रुग्ण दुरावल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने या भीषण स्थितीचा सामना केला. यातच आता राज्यात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ने चिंता वाढवली आहे. दरम्यान २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. परंतु लसीच्या तुटवड्याची समस्या अद्यापही कायम असल्याने ‘कधी सुरू, कधी बंद’ असेच लसीकरण सुरू आहे. यामुळे ४२ लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १६,३०,४०२ नागरिकांनी पहिला तर केवळ ५,४४,७८३ लोकांनी दुसरा डोस घेतला. १२.९७ टक्केच लोकांचे संपूर्ण लसीकरण झाल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
-१८ ते ४४ वयोगटात लसीकरण जोमात
१७ जानेवारी ते २० जूनपर्यंत १८ ते ४४ वयोगटात २,२०,२१८ नागरिकांनी पहिला, तर ९,३८५ नागरिकांनी दुसरा असे एकूण २,२९,६०३ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांमध्ये मोफत लसीकरणाला सुरुवात होताच या वयोगटात लसीकरणाने वेग धरला. ४,५०,२०० नागरिकांनी पहिला तर, ९४,५८३ नागरिकांनी दुसरा डोस असे एकूण ५,२०,६८८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले.
-२१ ते २० जुलैपर्यंत लसीकरण
::१८ ते ४४ वयोगटातील एकूण लसीकरण - ५,२०,६८८
::एकूण सर्व गटात पहिला डोस : ३,६४,१७६
:: एकूण सर्व गटात दुसरा डोस : १५९४०२
:: एकूण दोन्ही डोस : ५२३५७८
-आतापर्यंत एकूण लसीकरण
:: १८ ते ४४ वयोगटातील एकूण लसीकरण -७,५०,२९१
:: एकूण सर्व गटात पहिला डोस : १६,३०,४०२
::एकूण सर्व गटात दुसरा डोस : ५,४४,७८३
::एकूण दोन्ही डोस : २१,७५,१८५