नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांचा समावेश करण्यात आल्याने शहरातील सर्वच केंद्रांवर गर्दी होत आहे. मात्र, आवश्यक सोयी नसल्याने लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. शिवाय, गर्दीमुळे कोरोना पसरण्यास हे केंद्र कारणीभूत ठरत आहे. याची दखल घेत महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्व लसीकरण केंद्रे दोन शिफ्टमध्ये चालविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता ही केंद्रे सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’ यांना प्राधान्य देण्यात आले. २८ दिवसांनंतर म्हणजे, १४ फेब्रुवारीपासून दुसऱ्या डोसला सुरुवात झाली. सोबतच ‘फ्रंट लाइन वर्कर’ यांचे लसीकरण हाती घेण्यात आले, तर आता १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ११, दुसऱ्या दिवशी १५, तिसऱ्या दिवशी २० तर चौथ्या दिवशी २८ केंद्रांतून लसीकरण सुरू झाले. मागील चार दिवसांत ६०४२ ज्येष्ठांना तर ९४५ ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्यांना पहिला डोस देण्यात आला. परंतु केंद्रावरील लसीकरणाचे नियोजन फसल्याने गर्दी वाढली. यातून वाद, भांडणे वाढली. काही ठिकाणी पोलिसांची मदत घेण्याची वेळ आली. यातून मार्ग काढण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुढाकार घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यात प्रामुख्याने सकाळी ८ ते दुपारी ३ व दुपारी ३ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा सूचना शासकीयसह खासगी केंद्रांना दिल्या. सोबतच ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’चा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे, गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षारक्षकाची मदत घेण्याचे व पिण्याच्या पाण्यापासून ते बसण्याची सोय व स्वच्छतागृहाची सोय करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.
-लसीकरण केंद्रांसाठी आले नवीन नियम
: शासकीय व खासगी लसीकरण केंद्र दोन शिफ्टमध्ये चालवावे.
: सकाळी ८ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत केंद्र सुरू ठेवावे.
: गर्दी टाळण्याकरिता प्रत्येक लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन हेल्थ वर्कर यांचे रजिस्ट्रेशन, ऑनलाइन रजिस्ट्रेशन व स्पॉट रजिस्ट्रेशन असे ३ स्वतंत्र कक्ष स्थापित करावे. याकरिता ३ स्वतंत्र संगणक किंवा लॅपटॉप किंवा टॅबची व्यवस्था करावी.
: लाभार्थींना सहज समजेल असे सूचना फलक दर्शनी भागात लावावे.
: गर्दी नियंत्रणाकरिता सुरक्षारक्षकांची मदत घ्यावी.
: ज्येष्ठ नागरिकांकरिता बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
: कोविड प्रतिबंधक निकषाच्या अंमलबाजवणीकरिता आवश्यक नियोजन करावे.