लस उपलब्धतेबाबत संभ्रम : १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागणीनुसार लस उपलब्ध नसल्याने नागपूर शहरातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मागील चार दिवसापासून जवळपास ठप्प आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत लस उपलब्ध झाली नव्हती. यामुळे बुधवारी मनपाच्या महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र वगळता इतर केंद्रावर लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्या जाईल. तर महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे.
पहिला डोस घेऊन सात-आठ आठवड्याचा कालावधी संपलेल्यांची दुसरा डोस मिळावा, यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक जण लसीकरण केंद्रावर चौकशीसाठी येतात. परंतु लस कधी उपलब्ध होणार याबाबत केंद्रावरील कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने लसीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर दुसरा डोस मिळेल, असे सांगितले जाते. पण लस कधी उपलब्ध होईल, याबाबत शाश्वती नसल्याने मनपा प्रशासनाचीही कोंडी झाली आहे. मंगळवारी १६४७ व्यक्तींना लस देण्यात आली. यात प्रामुख्याने १८ वर्षांवरील व दुसरा डोस घेणाऱ्यांचा समावेश होता.
....
तीन केंद्रावर १८ वर्षांवरील व्यक्तींना लस
१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील. विशेष म्हणजे, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
,...
नागपूर शहरातील लसीकरण (४ मेपर्यंत)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४३,४२१
फ्रंटलाईन वर्कर - ४७,५५१
१८ वर्षांवरील १६०२
४५ वर्षांवरील - १,०३,६३२
४५ वर्षांवरील आजारी - ७५,९५२
६० वर्षांवरील - १,६१,१२८
एकूण - ४,३३,३०६
...
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २०,६५०
फ्रंटलाईन वर्कर - १३,०५२
४५ वर्षांवरील - १२,४९७
४५ वर्षांवरील आजारी - १०,४७४
६० वर्षांवरील -४६,२८०
दुसरा डोस एकूण-१,०३,१५३
एकूण लसीकरण - ५,३६,४५९