चिंता करण्याची गरज नाही: १८ वर्षांवरील लसीकरण तीन केंद्रावर सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक केंद्रांवर सध्या 'लस उपलब्ध नाही' असे बोर्ड झळकत आहेत. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अधिकृतपणे बंद आहे. लस उपलब्ध न झाल्याने ज्यांचा लसीचा पहिला डोस होऊन सहा ते आठ आठवड्याचा कालावधी झाला. दुसरा डोस मिळावा म्हणून काहींची धावपळ सुरू आहे. परंतु दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी पहिला डोस घेणारे सुरक्षित असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
साधारणपणे चार ते सहा आठवड्यात दुसरा बूस्टर डोस घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. पण आता लसच उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला तर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय चिलकर यांच्या मते, कुठल्याही लसीचा दुसरा डोस कधी घ्यायचा हे ही संशोधकांनी सांगितलेले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांपर्यंत घेतला तरी चालतो. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांनंतर घ्यायचा आहे. त्यात दोन आठवडे उशीर झाला तरी चालेल. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे वेळ जास्त लागतो आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ज्यांना पहिला डोस दिलाय त्यांना प्राधान्यक्रमाने दुसरा डोस दिला जाणार आहे.
...
दोन ते चार आठवड्यात अँटिबॉडी
तज्ज्ञांच्या मते, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारक शक्ती शरीरात जागवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे अँटिबॉडीज आणि प्रतिकार शक्ती काम करण्याचं प्रमाण वाढतं. तेव्हा पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे.
...
मंगळवारी लसीकरण बंद
शहरातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे मंगळवारी लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये व स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्या जाईल.
...
१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरु
१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
........
नागपूर शहरातील लसीकरण (३ मे पर्यंत)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४३३७९
फ्रंटलाइन वर्कर - ४७५४३
१८ वर्षांवरील ९३२
४५ वर्षांवरील - १०३४४४
४५ वर्षांवरील आजारी - ७५८६३
६० वर्षांवरील - १६१०२५
एकूण - ४३२१८५
...
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २०६११
फ्रंटलाइन वर्कर - १३००५
४५ वर्षांवरील - १२३९८
४५ वर्षांवरील आजारी - १०४६४
६० वर्षांवरील -४६०५५
दुसरा डोस एकूण-१०२५३३
एकूण लसीकरण - ५३४७१८