नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवार १ मार्चपासून सुरुवात होत आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनाही लस दिली जाणार आहे. मनपाच्या ११ तर ग्रामीण भागातील १५ केंद्रावर थेट लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठांना आधारकार्ड किंवा वयाच्या दाखल्याची तर ४५ ते ६० वयोगटातील जे व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त आहेत त्यांना डॉक्टरांकडून प्रमाणित केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यक्ता असणार आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर तर आता तिसऱ्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. ‘को-विन’अॅपवरच नोंदणी झालेल्यांचे लसीकरणाचा नियम आहे. परंतु सोमवारी तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांचे थेट लसीकरण होणार आहे. ज्येष्ठ आणि ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
- मनपाच्या केंद्रावर केवळ ५० ज्येष्ठांचेच लसीकरण
मनपाचे अप्पर आयुक्त जलज शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, शहरामध्ये लसीकरणाचे २० केंद्र आहेत. यातील शासकीय रुग्णालय व मनपाच्या ११ केंद्रावर ६० वर्षांवरील व ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्या ४५ व ६० वर्षांपर्यंतच्या ५० लाभार्थ्यांनाच लस दिली जाणार आहे.
- ज्येष्ठांना ही माहिती भरावी लागणार
लसीकरण केंद्रावर थेट लस दिली जाणार आहे. त्यापूर्वी काही माहिती भरावी लागेल. यात नाव, वय, लिंग आदींचा समावेश असेल.
- ४५ ते ६० वयोगटातील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज
४५ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त आहेत त्यांना नोंदणीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील. हे प्रमाणपत्र कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणित असणे आवश्यक आहे.
- को-मॉर्बिडिटीज आजारांचा समावेश
गंभीर आजारांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांशी संबंधित २० गंभीर आजारांचा (को-मॉर्बिडिटीज) समावेश आहे.
- ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आधारकार्ड
६० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना नोंदणीसाठी केवळ आधारकार्ड पुरेसे असणार आहे. ते नसल्यास मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट, पॅनकार्ड आदी ग्राह्य धरले जाणार आहे.
- कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन याचा पर्याय नसणार
ज्या लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागणार आहे.
- खासगी रुग्णालयात लसीकरण नाही
खासगी रुग्णालयातील केंद्रावर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. याबाबत मार्गदर्शक तत्त्व आले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- शहरातील या केंद्रांवर मिळणार लस
१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) २ केंद्र
२) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) २ केंद्र
३) मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
४) मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा
५) पोलीस हॉस्पिटल, काटोल रोड
६) डागा स्त्री रुग्णालय, गांधीबाग
७) कामागार रुग्णालय, सक्करदरा
८) पाचपावली न्यू पोलीस क्वॉर्टर
- ग्रामीणमध्ये या केंद्रावर मिळणार लस
१) काटोल ग्रामीण रुग्णालय
२) उमरेड ग्रामीण रुग्णालय
३) पारशिवनी ग्रामीण रुग्णालय
४) सावनेर ग्रामीण रुग्णालय
५) भिवापूर ग्रामीण रुग्णालय
६) रामटेक उपजिल्हा रुग्णालय
७) कामठी उपजिल्हा रुग्णालय
८) कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय
९) हिंगणा ग्रामीण रुग्णालय
१०) मौदा ग्रामीण रुग्णालय
११) कुही ग्रामीण रुग्णालय
१२) नरखेड ग्रामीण रुग्णालय
१३) लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह २ केंद्र
१४) शालिनीताई मेघे हॉस्पिटल, हिंगणा
- वेळ सकाळी ९ ते ५
मनपाच्या ११ तर ग्रामीण भागातील १५ केंद्रावर लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.