लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. त्यात केंद्र शासनाच्या नवीन निर्देशांनुसार
आता कोविशिल्डचा दुसरा डोस १२ आठवड्यांनंतर घ्यायचा आहे. त्यातही मागणीनुसार लसपुरवठा होत नसल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण संथ आहे. गुरुवारी मनपाच्या सर्व केंद्रांवर फक्त २५३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात २२९३ जणांना पहिला, तर २४१ जणांना दुसरा डोस देण्यात आला.
पहिल्या तीन टप्प्यांत मोठ्या उत्साहाने लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना आता लसीकरणासाठी भटकंती करावी लागत आहे. नागपूर शहरात ४ लाख ८१ हजार ८७९ नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने यातील जेमतेम १ लाख ५९ हजार २३३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मागील काही दिवसांपासून लसतुटवडा असल्याने नाममात्र लसीकरण सुरू आहे.
नागपूर शहरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा ६ लाख ४१ हजार ११२ नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर यापूर्वी रांगा लावून नागरिक लस घेत होते. मे महिन्यापासून केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यातही लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणाची गती संथ झाली आहे. १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण बंद करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीही पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.
....
नागपूर शहरातील लसीकरण (२० मेपर्यंत)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४४,८५०
फ्रंटलाइन वर्कर - ५२२५५
१८ वर्षांवरील -११,१४१
४५ वर्षांवरील - १,२१,९०४
४५ वर्षांवरील आजारी - ८०९६१
६० वर्षांवरील - १,७०,७६८
एकूण - ४,८१८७९
...
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २२७२६
फ्रंटलाइन वर्कर - १८७५४
४५ वर्षांवरील - २७९२७
४५ वर्षांवरील आजारी - १७२८१
६० वर्षांवरील -७२५४०
दुसरा डोस एकूण-१,५९२३३
एकूण लसीकरण - ६४१११२