नरखेड / जलालखेडा : भिष्णूर (ता. नरखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात शनिवारी (दि. २०) काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी १०५ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती डाॅ. उमेश देशमुख यांनी दिली.
नरखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये काेराेना रुग्णांमध्ये वाढत हाेत असून, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. तालुक्यातील नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयासाेबतच सावरगाव, मोवाड, जलालखेडा व मेंढला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वीच लसीकरणाला सुरुवात करण्यात आली हाेती. भिष्णूर प्राथमिक आराेग्य केंद्रात नुकतीच सुरुवात करण्यात आली. पूर्वी या आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या विवरा, तीनखेडा, पिंपळगाव, परसोडी, दिंदरगाव, खुशालपूर, सिंगारखेडा, खरसोली या गावांमधील नागरिकांना लसीकरणासाठी नरखेड, माेवाड किंवा जलालखेडा येथे जावे लागायचे. भिष्णूर येथे ही साेय झाल्याने त्यांची पायपीट वाचली आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. मोठे, डॉ. उमेश देशमुख, सतीश रेवतकर, मोतीराम नासरे, अनिल रेवतकर, गजानन नासरे, जिजा रेवतकर, प्रकाश नासरे, छाया ठाकरे. अनिता राऊत यांच्यासह आराेग्य कर्मचारी, आशासेविका व नागरिक उपस्थित होते.