लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : चिचाेली (खापरखेडा) (ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत चिचाेली, पाेटा (चनकापूर) व सिल्लेवाडा या तीन ठिकाणी काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केले आहे. लसींच्या तुटवड्यामुळे या तिन्ही केंद्रांवर आठवड्यातून तीन दिवस लसीकरण केले जाते. त्यामुळे गर्दी वाढत असून, केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपायययाेजनांचे पालन केले जात नसल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे.
लसीकरण केंद्र सुटीचा दिवस वगळता अन्य दिवस सुरू असणे अनिवार्य आहे. मात्र, लसींचा साठा दाेन ते तीन दिवसांनी उपलब्ध करून दिला जात असल्याने साठा प्राप्त हाेताच केंद्र सुरू केले जाते. अन्यथा बंद असते, अशी माहिती आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. कामात सुसूत्रता यावी म्हणून नागरिकांना आधी टाेकन दिले जाते. शुक्रवारी लसींचा साठा प्राप्त झाल्याने तिन्ही केंद्र सुरू करण्यात आले. लस घेण्यासाठी नागरिकांनी या तिन्ही ठिकाणी टाेकन घेण्यासाठी सकाळी ७ वाजतापासून रांगा लावायला सुरुवात केली हाेती.
लसींचा साठा कमी आणि नागरिक अधिक असल्याने अनेकांना टाेकन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना निराशा हाेऊन लस न घेता घरी परत जावे लागले. लसीचा दुसरा डाेस घेणाऱ्या नागरिकांना मॅसेज पाठविला जाताे. त्यांना त्या दिवशी लस न मिळाल्यास नंतरच्या दिवशी लस घेण्यासाठी पुन्हा केंद्रावर जावे लागते. टोकननुसार ऑनलाईन नाेंदणी केली जात असून, त्यानंतर लस दिली जात असल्याचे कर्मचारी सांगतात.
या तिन्ही केंद्रावरील नागरिकांची गर्दी पाहता मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह अन्य बाबी उघड झाल्या. या रांगेत काेण रांगेतील नागरिकांना सांगायला तसेच कुणी सांगितले तर नागरिक त्यांचे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे लसीकरण केंद्र आठवडाभर सुरू ठेवावे तसेच नागरिकांची संख्या व मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
५३४ नागरिकांनी घेतली लस
या तिन्ही केंद्रांवर शुक्रवारी (दि. २३) एकूण ५३४ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. यात चिचाेली केंद्रातील २२०, सिल्लेवाडा येथील २१६ आणि पाेटा (चनकापूर) केंद्रातील ९८ नागरिकांचा समावेश आहे. या ५३४ नागरिकांमध्ये लसीचा पहिला व दुसरा डाेस घेणारे समाविष्ट आहेत. रांगेत काेण काेराेना व अन्य आजाराने संक्रमित आहे, हे कळायला मार्ग नसल्याने रांगेतील नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे काेराेना, डेंग्यू, मलेरिया व विषाणूजन्य ताप या आजाराचे इतरांना संक्रमण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.