- उदय अंधारेनागपूर : वैज्ञानिक संशाेधन आणि विशेषतः काेणत्याही आजारावरील लसीच्या संशाेधनाचा डेटा विकसनशील आणि अविकसित अशा सर्व देशांना त्यांच्या गरजेनुसार प्राधान्याने शेअर केला जावा, असे मत रसायनशास्त्रातील नाेबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा याेनाथ यांनी व्यक्त केले.
१०८ व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसमध्ये सहभागी हाेण्यासाठी नागपुरात आलेल्या प्रा. याेनाथ यांनी प्रस्तुत लाेकमत प्रतिनिधीशी संवाद साधला. ‘केमिकल क्रिस्टलाेग्राफर’ अशी ओळख असलेल्या प्रा. याेनाथ या इस्रायलच्या रहिवासी आहेत. त्यांच्या मते कोणत्याही संशाेधनाचे उद्दिष्ट अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देण्याचे असते, त्यामुळे त्यात गरीब आणि श्रीमंत देश असा भेदभाव केला जाऊ शकत नाही. विकसनशील देशांविरुद्ध होत असलेला भेदभाव रोखण्यासाठी एकसमान वैज्ञानिक धोरण असावे की नाही, हे सांगणे आपल्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे त्या म्हणाल्या.
आजाराच्या संक्रमणाची नेमकी जागा शोधणे सुरू
वैज्ञानिक समुदाय पुढच्या पिढीतील अँटिबायोटिक्स (प्रतिजैविक) च्या विकासात गुंतलेला आहे, जे सूक्ष्मजीवांच्या प्रतिकारासाठी कमी योग्य आहेत. वैज्ञानिक समुदाय नेहमीच या प्रतिकार विरुद्ध लढू इच्छितो. संशाेधकांचा ‘ फ्लोरोसेंट अँटिबायोटिक्स ’ वर संशाेधन सुरू आहे, जे आजाराच्या संक्रमणाची नेमकी जागा शोधू शकेल. काही वैशिष्ट्ये ओळखून त्यांची रचना केली जात असल्याचे प्रा. याेनाथ यांनी स्पष्ट केले. विज्ञान हा भूतकाळातील गाेष्टींवर सतत शाेध आणि सुधारणा करणारा विषय आहे आणि त्यामुळे लाेकांचे आयुर्मान वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कोरोना विषाणू पहिला नाही, जग त्यावर नियंत्रण मिळवेल
कोविड-१९ चा विचार केल्यास हा पहिला विषाणू नाही, ज्याने धाेका निर्माण केला. यापूर्वी अनेक विषाणू आणि जिवाणूंनी कहर केला होता ; पण त्यावर नियंत्रण मिळविले गेले. कोविड विषाणूच्या बाबतीतही असेच आहे आणि मानवजात या लढ्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे संशाेधन थेट कोविडशी संबंधित नसले तरी, ज्यावर त्यांचे संशाेधन आधारित आहे, त्याच जैव रासायनिक प्रक्रियेचा वापर काेविड विराेधी लसीकरणासाठी करण्यात आला आहे. हे संशाेधन सर्व आनुवंशिक विकारांवर उपचार करण्यासाठी लस तयार करण्याचे साधन प्रदान करते.
वैज्ञानिकांची काेणतीही लाॅबी नाही
संशाेधनाच्या कामात अडथळा आणणारी आणि विज्ञानाचा विकास थांबविणारी शक्तिशाली वैज्ञानिकांची काेणतीही लॉबी नाही. हे केवळ एखाद्याच्या कल्पनेचे चित्रण होते आणि ते निश्चितच खरे नाही. - प्रा. ॲडा याेनाथ