भिवापूर : कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर ही महत्त्वाची आयुधे आहेत. अशात संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणारी प्रतिबंधित लस प्रत्येकाने घ्यावीच, असा आग्रह शासन व प्रशासन करीत आहे. मात्र, भिवापूर तालुक्यात हा आग्रह निव्वळ तोंडसुख देणारा ठरला आहे. कारण लस संपलेली आहे. पुरवठा थांबलेला आहे. त्यामुळे लसीकरण करायचे कसे, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. तालुक्यात २० हजार लोकांचे लसीकरण करण्याचे प्राथमिक टार्गेट तालुका व्यवस्थापनाने ठेवले आहे. आजच्या स्थितीत १४,५०० च्या जवळपास लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यात ६० वर्षांवरील, ४५ वर्षांवरील महिला व पुरुष, फ्रंट लाईन वर्करचा समावेश आहे. प्रारंभी लसीकरणासाठी शासन व प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले गेले. मात्र, सामान्य नागरिकांत काहीअंशी गैरसमज पसरल्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. आता मात्र संसर्गाचा प्रकोप वाढत चालला आहे. दररोज मृत्यूचे आकडे हृदय हेलावून टाकणारे आहेत. त्यामुळे बचावाकरिता प्रतिबंधात्मक लस महत्त्वाची ठरत आहे. हे कळून चुकल्याने गत आठवडाभरापासून तालुक्यात लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, आता लस संपल्याने लसीकरण करायचे कसे, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.
मागणीपेक्षा पुरवठा कमी
तालुक्यात दररोज २ हजार लसीची मागणी आहे. मात्र, त्या तुलनेत फारच कमी पुरवठा होत आहे. कधी हजार तर कधी पाचशे लसीचे डोस मिळत आहेत. मंगळवारी लसीचे १ हजार डोस मिळाले होते. ते संपल्यानंतर आता मात्र ठणठणाट आहे. त्यामुळे उद्या लसीकरण केंद्र बंद झाल्यास नवल वाटू नये.
लोकप्रतिनिधी गप्प
तालुक्यात लसीचा मोठा तुटवडा आहे. मागणीएवढा पुरवठा व्हावा. यासाठी तालुकास्तरावरील अधिकारी धडपडत आहेत. पुरवठा वाढविण्यासाठी वरिष्ठांना साकडे घालत आहे. मात्र, तालुकास्तरावरील यंत्रणेच्या या प्रयत्नांना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ‘बुस्टर डोज’ मिळताना दिसत नाही. काही लोकप्रतिनिधी क्वारंटाईन, तर काही लोकप्रतिनिधी निव्वळ फोटोसेशनमध्ये गुंग आहेत. आ. राजू पारवे यांनी लसीच्या तुटवड्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असा सूर व्यक्त होत आहे.
शहरात केंद्र कसे वाढविणार?
लसीची मागणी वाढल्याने तालुका व्यवस्थापनाने तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण सुरू केले आहे. आता भिवापूर शहरात लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद व मागणी लक्षात घेता, तालुका प्रशासनाने शहरात चार ते पाच लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, गत दोन- तीन दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्यामुळे प्रशासनही हतबल आहे. शहरात लसीकरण केंद्राची संख्या वाढविली तरी लस कुठून आणायची हा प्रश्नच आहे.