नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितलेली नाही. वडेट्टीवार यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करून खोडसाळ राजकारण करू नये, असे प्रतिपादन गडकरी यांनी गुरुवारी केले.
गडकरी यांनी फडणवीस यांच्याविरोधात महत्त्वाची बाब गुपचूपपणे सांगितली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. यावर गडकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णत: निराधार व तथ्यहीन आहे. फडणवीस हे भाजपातील महत्त्वाचे नेते आहेत व माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. एकमेकांविरोधात कारस्थान करणे व एकमेकांची जिरविणे ही काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेसचे मंत्री भाजपमध्येदेखील असा प्रकार करू पाहत आहेत, असा आरोप गडकरी यांनी केला.
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती झाली. विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील चांगले कार्य करत असून महाविकास आघाडी सरकारच्या चुकांवर नेमके बोट ठेवत आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी काँग्रेसला कुणीच भाव देत नाही व त्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये नैराश्य आहे. चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसचे नेते बेजबाबदार वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावादेखील गडकरी यांनी केला.