लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यभरात संभ्रम निर्माण झाला होता. सरकारमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर येऊन २४ तासदेखील झाले नसताना वडेट्टीवार यांचा आणखी एक दावा फोल ठरला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत अनलॉकबाबत दिशानिर्देश जारी होतील, असे वडेट्टीवार यांनी सकाळच्या सुमारास सांगितले. परंतु, प्रत्यक्षात रात्रीपर्यंत मुख्यमंत्री किंवा सरकारने अशी कुठलीही घोषणा केली नाही.
गुरुवारच्या वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने असा निर्णय झाला नाही, असे स्पष्ट केले होते. शुक्रवारी सकाळी वडेट्टीवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, अनलॉकसंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अनलॉकसंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही गाईडलाइन्स तयार केल्या आहेत. त्याबाबतचा मसुदा मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळाली की जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. दुपारपर्यंत याबाबतचे दिशानिर्देश जारी होतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. मात्र, रात्रीपर्यंत सरकारकडून कुठलेही आदेश जारी न झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.