लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड खरेदी आणि घर बांधणीसाठी कर्ज प्रकरण सादर करून पाच आरोपींनी बँक आॅफ बडोदाच्या म्हाळगीनगर शाखेला ३२ लाखांचा गंडा घातला. ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर गुरुवारी सक्करदरा पोलिसांनी एका महिलेसह पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ममता मधूसुदन खंडेश्वर (रा. लक्ष्मीनगर), प्रणव रत्नाकर पावसेकर (रा. गणेशनगर), नितीन मूलचंदानी, अभिदत्त अरुणकुमार माने (रा. ओमनगर) आणि कुंजबिहारी तिवारी (रा. मनीषनगर) अशी आरोपींची नावे आहेत.या पाच आरोपींनी संगनमत करून ७ फेब्रुवारी २०१४ ला बँक आॅफ बडोदाच्या म्हाळगीनगर शाखेत भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी कर्ज प्रकरण सादर केले. अस्तित्वात नसलेल्या भूखंडाचे बनावट रिलीज लेटर तसेच अन्य बनावट कागदपत्रेही आरोपींनी सादर केली. त्याआधारे बँकेतून ३२ लाख रुपयांचे कर्ज उचलले. नमूद आरोपींनी ती रक्कम आपसात वाटून घेतली. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्याने बँक अधिकाºयांनी उपरोक्त आरोपी कर्जदारांकडे वसुलीसाठी संपर्क केला. तेव्हा प्रत्येकजण एकदुसºयाकडे बोट दाखवू लागले. बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली. आरोपींनी तारण ठेवलेल्या भूखंडाची कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे आणि नमूद ठिकाणी तो भूखंडच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तत्कालीन व्यवस्थापक राजेंद्र हरिराम चहांदे (वय ५२, रा. धन्वंतरीनगर) यांनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी या प्रकरणी आरोपी ममता खंडेश्वर, प्रणव पावसेकर, नितीन मूलचंदानी, अभिदत्त माने आणि कुंजबिहारी तिवारी या पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे.