नागपूर : विदर्भातील लेखक, अभ्यासक, संशाेधकांनी मराठी साहित्य क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. मात्र आपल्याच उदासीनतेमुळे महाराष्ट्राच्या साहित्य जगतात या साहित्यिकांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, अशी खंत पद्मगंधा प्रतिष्ठानच्या पाचव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डाॅ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केली.
पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे साई सभागृह, शंकरनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष अजय पाटील, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, जेष्ठ लेखिका आशा बगे, जेष्ठ लेखिका डॉ .भारती सुदामे, शेफ मा.विष्णू मनोहर, सामाजिक कार्यकर्ते व लेखक शंकरराव जाधव, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, उपाध्यक्ष प्रभा देऊस्कर उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेचा शोध घेणाऱ्या ‘गर्जते मराठी’ या स्मरणिकेचे तसेच, सुधीर राठोड यांचे ‘नर्मदे हर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डाॅ. प्रज्ञा आपटे यांनी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या विदर्भातील मातब्बर लेखक, कवी, समीक्षक, संशाेधकांच्या साहित्य कृतीचा उल्लेख करीत विदर्भाचे हे संचित जतन करण्याची गरज व्यक्त केली. या साहित्यिकांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांच्या नाळ जुळवावी लागतेल, अभ्यासावे लागेल, त्यांच्याशी संबंध राखावे लागतील व साहित्य संस्थांनी ते कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. पंकज चांदे यांनी साहित्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून साहित्यकृती करण्याचे आवाहन केले. डाॅ. भारती सुदामे यांनी सर्व साहित्य संस्थांना नवाेदित साहित्यिक, लेखक, कविंची दखल घेण्याचे आवाहन करीत यामुळे विदर्भातील साहित्यकृतींचा इतिहास तयार हाेईल व वैदर्भीय बाेलीसह मराठी पुढे जाईल, अशी भावना व्यक्त केली.
शंकरराव जाधव यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी साहित्य संस्था व मराठीप्रेमींनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. अजय पाटील यांनी प्रत्येक मराठी माणसाने भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे यांनी केले. संचालन वर्षा देशपांडे, संगीता वाईकर, नेहा मुंजे, स्वामी मोहरील, शमा देशपांडे, मीना मोरोणे, शुभांगी गाण, जयश्री हजारे, डॉ. लीना निकम यांनी केले. प्रभा देऊस्कर यांनी आभार मानले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, लेखिका सुप्रिया अय्यर, जयश्री रुईकर, रोहिणी फाटक आदींचा सत्कार करण्यात आला.
साहित्य समाजाला दिशा देणारे : सुधीर मुनगंटीवार
साहित्य हे मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे आयुध आहे. साहित्याने केवळ मनाचेच नाही तर मेंदू व हृदयाचे समाधान होते आणि हे समाधान चिरकाल टिकणारे असते, असे मत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. विदर्भातील ग्रामीण भागात आजही अनेक साहित्यिक चांगली साहित्य निर्मिती करीत आहे. त्यांचे साहित्य नागपूर, मुंबईसारख्या शहरामध्ये आणण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. पद्मगंधाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ
साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष अजय पाटील, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे व इतर कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.