लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. रविवार २७ आॅगस्ट २००० रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नापूरला जहीर सभा होती. ते शनिवारी २६ तारखेलाच नागपूरला आले होते. राजभवनावर ते थांबले होते. तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात काँग्रेस खासदरांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. रिपाइंचे ज्येष्ठ नेते व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई, माजी खासदार विजय दर्डा , माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वातील एका तगड्या शिष्टमंडळाने राजभवनावर त्यांची भेट घेतली व चर्चा केली. उद्याच्या नागपूरच्या जाहीरसभेत पंतप्रधनांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असे आवाहन शिष्टमंडळाने केले होते. तेव्हा पंतप्रधान असलेल्या वाजपेयी यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता विदर्भवाद्यांचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेतले होते. विलास मुत्तेमवार यांनी त्या चर्चेचे प्रास्ताविक केले. विजय दर्डा तेव्हा वाजपेयींना म्हणाले ‘आपण चांगल्या मूडमध्ये आहात. विदर्भ राज्य देण्याची तुमची इच्छा आहे, तुमच्या डोळ्यात ते दिसते आहे. विदर्भाच्या जनभावना समजून घ्या आणि विदर्भाचा भरभराटीचा मार्ग प्रशस्त करा. नागपुरात आपण तशी घोषणा करा, तुमचा हा आशिर्वाद विदर्भाचे लोक सदैव लक्षात ठेवतील.’त्यावर वाजपेयी म्हणाले की, एका राज्याच्या निर्मितीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व विदर्भात आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भाचा ठराव समत झालेला नाही. सर्वांची सहमती होवो म्हणून तीन नवीन राज्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातही तसे झाले तर माझे काम सोपे होईल. विदर्भ राज्य झाले नाही, याचे शल्य मला बोचते.विदर्भवाद्यांच्या या तगड्या शिष्टमंडळात ज्येष्ठ विदर्भवादी नेते, टी.जी. देशमुख, शंकरराव गडाम, बनवारीलाल पुरोहित, बाळकृष्ण वासनिक, सदानंद फुलझेले, उमाकांत रामटेके, प्रा. हरीभाऊ केदार, नितीन राऊत, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, देवसरकर, सुरेश देवतळे, सेवक वाघाये, गोविंदराव वंजारी, किशोर काशीकर, अशोक धवड, दमयंती देशभ्रतार, डॉ. मंशा-ऊर रहेमान, अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश गजभिये, हरगोविंद बजाज, बसंतलाल शॉ, शेख हुसैन, गोविंद रेणू, एन.के. सारडा, प्रकाश वाधवानी, आदर्श डागा, उमेश चौबे, रामराव वाघाळे, रमण पैगवार, रीना रॉय आदी उपस्थित होते.
विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:03 PM
अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती.
ठळक मुद्देतगड्या शिष्टमंडळापुढे व्यक्त केली होती भावना : रा.सू. गवई, विजय दर्डा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली होती भेट