नागपूर : लहान मुले कशी चॉकलेट दिसले रे दिसले तुटून पडतात आणि कसलीही तमा न बाळगता त्यांचे सर्वांग चॉकलेटमय होऊन जाते. त्यांच्याकडे बघणे आनंददायी असते. चॉकलेट गिळण्यात व्यस्त असलेली हीच बालके जेव्हा एखादा तुकडा आपल्याला देतात किंवा आपल्या ओठांना लावतात, तेव्हा जो स्वर्गीय आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. हा गोडवा अपरंपार असतो. आपली ज्याच्यावर किंवा जिच्यावर नजर असते, त्याच्याकडून किंवा तिच्याकडून असेच एखादे चॉकलेट प्रेमपूर्वक मिळाले तर सांगा, कसे वाटेल?
व्हॅलेंटाईन वीकमधला ‘रोज डे’, ‘प्रपोज डे’नंतर येणारा तिसरा दिवस म्हणजे ‘चॉकलेट डे’. व्हॅलेंटाईन वीकमधील या दिवसांची रचनाही बघा कशी खास आहे. आधी गुलाबाने अव्यक्त भावना व्यक्त करा. मग, थेट मनातले बोलून टाका आणि त्यानंतर स्वीकृतीचा गोडवा म्हणून चॉकलेट सेलिब्रेशन करा. आता हा गोडवा प्रत्येक प्रेमीयुगुल होऊ बघणाऱ्यांच्या नशिबी नक्कीच नसणार; परंतु इतरांच्या सेलिब्रेशनमध्ये आपल्या आनंदाचे स्थान नक्कीच असते. कुणाच्या तरी आनंदात आपला गोडवा माणून घेण्यास हरकत ती काय. हे झाले प्रेमीयुगुलांचे!
मग करा ना सेलिब्रेशन
चॉकलेट डे सेलिब्रेट करायला नात्यांचे बंधन असेल तर ती भारी असहिष्णूता का म्हणू नये? आपण सारे सहिष्णू संस्कृतीतले आणि म्हणूनच तर पश्चिमेकडला हा उत्सव भारतात भरपूर साजरा होतो. रोजच्या व्यस्ततेत घराकडे होणारे दुर्लक्ष ‘चॉकलेट डे’ला भरून काढता येऊ शकते. रोजच्या गरजांच्या पूर्ततेसाठी राबराब राबवताना घरातही कुणी आपला-आपली ‘व्हॅलेंटाईन’ आहे, याचे भान चॉकलेट भरवून जागृत करता येऊ शकते, बरं का! मग बघा, घर कसे भावनांच्या उद्धरणातून सेलिब्रेशनने भरून निघेल.