परिचय मेळावा : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : वाल्मिकी समाजाने इतर समाजाची जेवढी सेवा केली, तेवढी इतर कोणत्याही समाजाने केलेली नाही. त्यामुळे आजच्या सामाजिक परिवर्तनात या समाजाचीही प्रगती व्हावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री वाल्मिकी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित तिसऱ्या युवक-युवती परिचय मेळाव्याचे शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लॉ कॉलेज चौकातील जवाहर वसतिगृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक संदीप जोशी व परिणय फुके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करू न कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. फडणवीस पुढे म्हणाले, वाल्मिकी समाजातील प्रतिभावंत मुले या समाजाची ताकद आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढीतील बदल पाहायला मिळाला. आज वधू-वर परिचय मेळावा आवश्यक झाला आहे. अलीकडे महिलांचा सन्मान कमी होऊ लागला आहे. त्यांच्यावर अधिकार थोपविले जात असून, यातून समाजाचा ऱ्हास होत आहे. महिला ही परिवार व समाजाला दिशा देऊ शकते. त्यामुळे तिचा सन्मान झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही, असे स्पष्ट करू न वाल्मिकी समाजातील तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला मजबूत करावे, असे आवाहन केले. यावेळी वाल्मिकी समाजातील महिलांनी रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधली. तसेच वाल्मिकी फाऊंडेशनतर्फे ५१ हजार रुपयांच्या सहायता निधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. हा निधी जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये वापरला जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संजय बंगाले, वैशाली चोपडे, सुनील तांबे, रमेश गिरडे, शंकरराव भुते, गिरीश पांडव, संजय करोशिया, विजय करोशिया उपस्थित होते. संचालक वाल्मिकी फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश डागोर यांनी केले.(प्रतिनिधी)कौशल्य विकास केंद्र उभारणार वाल्मिकी समाजातील युवक-युवतींना खासगी क्षेत्रात रोजगारांच्या संधी उपलब्ध करू न देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरिता तातडीने पावले उचलण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट करू न, त्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असून महानगर पालिकेने या कामी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. तसेच वाल्मिकी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी येत्या आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले.
वाल्मिकी समाजाची प्रगती व्हावी
By admin | Published: August 29, 2015 3:18 AM