निशांत वानखेडे
नागपूर : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषून, ऑक्सिजन सोडण्यासह मनुष्य आणि पर्यावरणाला देणाऱ्या फायद्याचा हिशेब केल्यास १०० वर्षे जगणाऱ्या कोणत्याही झाडाची किंमत ही ७२ लक्ष रुपये ठरते. सर्वोच्च न्यायालयानेच नुकत्याच दिलेल्या निर्णयात एका झाडाची ही किंमत निर्धारित केली होती. अजनी आयएमएस प्रकल्पासाठी ३० हजाराच्या वर झाडांचा बळी जाण्याचा अंदाज आहे. न्यायालयाच्या दृष्टीने हिशेब केल्यास या झाडांची किंमत आहे तब्बल २१,६०० कोटी रुपये, जी एकूणच प्रकल्पाच्या खर्चापेक्षा चारपट अधिक आहे. नवीन प्रकल्प आराखडा तयार करताना याचा विचार केला जाईल का, हा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे.
नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाचा नवा डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जनभावना लक्षात घेता जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही भावना कायम ठेवावी, ही अपेक्षा आहे. पर्यारवरण अभ्यासक जयदीप दास म्हणाले, एनएचएआयने १९०० झाडांचा विचार करून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) केले हाेते. मात्र महापालिकेने ५५ एकरच्या अजनीवनात ७००० झाडे असण्यावर शिक्कामाेर्तब केल्यानंतर नव्याने ईआयए मूल्यांकन आवश्यक आहे. हे केवळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मूल्यांकन असेल. हा प्रकल्प ४९० एकरामध्ये हाेऊ घातला असून, त्यात ३० हजाराच्यावर झाडे जाणार आहेत. त्यामुळे ३० हजार झाडांचा विचार करून ईआयए हाेणे आवश्यक असल्याची भावना दास यांनी व्यक्त केली.
इंधन बचतीपेक्षा झाडांची किंमत अधिक
एनएचएआयने आयएमएस प्रकल्पामुळे हाेणारे फायदे सांगताना, प्रकल्प झाल्यास २०५० पर्यंत १६,३१,७३७ लिटर इंधनाची बचत हाेईल, असा अंदाज नाेंदविला आहे. शिवाय ७५ लाख ६५ हजार १९६ किलोग्रॅम कार्बनचे उत्सर्जन राेखण्यात यश येईल, असाही दावा केला हाेता. न्यायालयाच्या मूल्यांकनानुसार एक झाड वर्षभरात वेगवेगळ्या रूपात फायदा देते, त्याची किंमत ७२ हजार रुपये हाेते. १०० वर्षात हीच किंमत ७२ लक्ष रुपये हाेते. पहिल्या टप्प्यातील ७००० झाडांचा विचार केल्यास त्यांची किंमत हाेते ५ हजार ४० काेटी रुपये. ही किंमत इंधन बचत, कार्बन उत्सर्जन राेखण्याचा खर्च आणि प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खर्चापेक्षा अधिक असल्याचे जयदीप दास यांनी सांगितले.
न्यायालयाच्या मूल्यांकनानुसार एका झाडाने