नागपूर : ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कडबी चौकातील बेझनबाग मैदान येथे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सभा आयोजित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे नव्याने अर्ज सादर करण्याची मुभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिली, तसेच हा अर्ज तातडीने सादर करावा व पोलीस आयुक्तांनी गुणवत्ता तपासून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, असेही सांगितले.
भारत मुक्ती मोर्चाने आधी सभा व महारॅली आयोजित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी गेल्या २२ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांना अर्ज सादर केला होता. महारॅली बेझनबाग मैदान ते महाल येथील बडकस चौकापर्यंत काढण्याची योजना होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून बडकस चौक अगदी जवळ आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता लक्षात घेता २८ सप्टेंबर रोजी सभा व महारॅलीला परवानगी नाकारण्यात आली. त्याविरुद्ध भारत मुक्ती मोर्चाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, बेझनबाग मैदान येथे केवळ सभा आयोजित केली जाऊ शकते, असा मुद्दा पुढे आला. सरकारनेही केवळ सभा घेतली जात असेल तर, गुणवत्ता तपासून परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले. करिता, उच्च न्यायालयाने हा आदेश दिला व प्रकरणावर मंगळवारी दुपारी २.३० वाजता पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदौस मिर्झा यांनी बाजू मांडली.
आरएसएस मुख्यालयावर ६ ऑक्टोबरला मोर्चा काढणारच
देशाचे संविधान बदलण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुरू आहे. आदिवासी व ओबीसींचे बळजबरीने हिंदुकरण सुरू आहे, यासह विविध १३ मुद्द्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चातर्फे ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बेझनबाग मैदान येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर रॅली काढली जाणार असल्याचा निर्धार भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. वामन मेश्राम म्हणाले, या रॅलीत सुमारे २ लाख लोक सहभागी होतील. नागपूर पोलिसांकडे रॅलीसाठी रीतसर परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप काहीही कळविण्यात आलेले नाही. परवानगी मिळाली नाही तर आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, असा इशारा देत रॅली काढणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आम्ही घटनात्मक चौकटीत मोर्चा काढणार आहोत. मात्र, मोर्चात आरएसएस आपले लोक घुसवून हिंसा करण्याच्या विचारात आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय बुद्धिष्ट भिक्खू संघाचे भंते हर्ष बोधी यांनी या रॅलीला भिक्खू संघाचे समर्थन जाहीर केले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. विलास खरात यांनी संविधान वाचविण्यासाठी ही रॅली काढली जात असल्याचे स्पष्ट केले.
गडकरी-फडणवीस यांचे दीक्षाभूमीवर काम काय?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दीक्षाभूमीवर धर्मपरिवर्तन होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे मंत्री असले तरी ते मूळत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. त्यामुळे त्यांचे दीक्षाभूमीवर काम काय, असा सवाल वामन मेश्राम यांनी केला. गडकरी-फडणवीस यांनी स्वत:च नैतिकदृष्ट्या दीक्षाभूमीवर येऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
फोन टॅपिंग का?
- आपले फोन टॅप होत असल्याचा आरोप वामन मेश्राम व डॉ. विलास खरात यांनी केला. आम्ही दहशतवादी आहोत का, असा सवाल करीत या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.