शासनाच्या आदेशाला हरताळ : ही तर वरिष्ठांची हुकूमशाही? जीवन रामावत नागपूर शासनाच्या आदेशाला हरताळ फासून आपल्या शासकीय बंगल्यावर वनमजुरांना राबविणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या ‘त्या’ प्रामाणिक वनमजुराला संबंधित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह तात्काळ उचलबांगडी करण्याची तंबी दिली आहे. वन विभागाचे मुख्यालयात असलेल्या ‘वनभवन’ येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) यांनी १५ फेब्रुवारी रोजी (बुधवारी) उपवनसंरक्षक नागपूर यांच्या नावे एक पत्र जारी केले असून, त्यात वनमजूर शिवचरण परतेकी यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करून, त्यांची तात्काळ उचलबांगडी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यांचा हा आदेश म्हणजे वरिष्ठांची हुकूमशाही असल्याचा संताप वनमजुरांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ ने मंगळवारी ‘वनमजूर अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून वन विभागात सुरू असलेल्या वनमजुरांच्या या शोषणाला वाचा फोडली होती. नागपुरात राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय असून, येथे राज्याचे वनबल प्रमुखांसह वन विभागातील सर्वच उच्चपदस्थ अधिकारी बसतात. मात्र असे असताना येथेच शासकीय आदेशाचे खुलेआम धिंडवडे उडवून वनमजुरासारख्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे शोषण होत असताना सर्व जण मूग गिळून बसले आहेत. एवढेच नव्हे तर वन विभागाच्या प्रसिद्धी व माहिती अधिकाऱ्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून त्यात शासकीय बंगला ही शासनाची मालमत्ता असल्याने तेथील झाडोरा, शासकीय वाहने, संरक्षण व परीक्षणाची जबाबदारी वनमजुरांवर देणे नियमानुसार असल्याचा दावा केला आहे. मात्र त्याच वेळी त्यांना वनमजूर हा क्षेत्रीय कर्मचारी असून, त्याचे काम वनसंरक्षणाचे असल्याचे कदाचित त्यांना विसर पडलेला दिसून येत आहे. माहिती सूत्रानुसार, वन विभागातील वरिष्ठ वन अधिकारी केवळ वनमजुरांनाच आपल्या बंगल्यावर राबवीत नाही तर अनेकांच्या बंगल्यावर वनरक्षक आणि वनपाल दर्जाचे कर्मचारी स्वयंपाक करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आपली मक्तेदारी समजली असून, त्यांना आपल्या बंगल्यावर राबवून घेतले जात आहे. आयात वनमजुरांवर टांगती तलवार वन विभागात प्रत्येकजण या वनमजुरांचा आपल्या सोईनुसार उपयोग करून घेत असल्याचे दिसून येत आहे. एकट्या पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयात तब्बल आठ वनमजूर काम करीत असून, त्यापैकी काहीजणांना वरिष्ठांनी आपल्यासोबत बाहेरून आयात केले आहे. त्यापैकीच विनोद बोरकर हा एक वनमजूर मागील पाच वर्षांपासून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयात ठाण मांडून बसला आहे. या वनमजुराला येथील तत्कालीन क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी नवेगाव बांध येथून आपल्या सोबत आणले होते. तेव्हापासून हा वनमजूर नागपुरातच काम करीत आहे. मागील पाच वर्षे तो केवळ तत्कालीन क्षेत्र संचालकांच्या सेवेत होता. मात्र अलीकडचे या कार्यालयात सत्तापालट झाला असून, आता अशा आयात झालेल्या कर्मचाऱ्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिपाई झोटिंग यांचा मृत्यू वनमजूर शिवचरण परतेकी यांच्यासोबत संबंधित वन अधिकाऱ्याच्या बंगल्यावर तैनात असलेल्या सुभाष झोटिंग या शिपायाचा मागील २४ जानेवारी २०१७ रोजी मृत्यू झाला आहे. एपीसीसीएफ (माहिती तंत्रज्ञान व धोरण), नागपूर यांनी मागील १८ जानेवारी २०१७ रोजी स्वत:च्या स्वाक्षरीने एक पत्र जारी करून त्यात आपण १९ ते २४ जानेवारीदरम्यान शासकीय दौऱ्यावर जात असल्याने त्यांचे शासकीय निवासस्थानी शिपाई सुभाष झोटिंग व वनमजूर शिवचरण परतेकी यांनी आळीपाळीने देखभालीची कामे करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार झोटिंग यांनी २४ जानेवारीपर्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले, मात्र त्याच दिवशी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
‘त्या’ वनमजुराला ‘उचलबांगडी’ची तंबी
By admin | Published: February 17, 2017 2:57 AM