लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनमुळे बंद पडलेले सेमिनरी हिल्सस्थित बालाेद्यानची ओळख असलेल्या वनबालाची चाके अद्याप थांबलेलीच आहेत. रेल्वे ट्रॅक खराब झाल्याने व गिट्टी उखडल्याने वनबाला बंद पडली. ती पुन्हा धावायला संपूर्ण ट्रॅक दुरुस्त करावी लागणार आहे. वन विभागाने ट्रॅक दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा नियाेजन समितीकडे (डीपीडीसी) प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात हाेईल व मार्चनंतरच वनबाला पुन्हा धावू लागेल, अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
लाॅकडाऊनमध्ये वनबालाच्या रेल्वे रुळाचे लाकडी स्लीपर खराब झाले आहेत. याशिवाय रुळावरील गिट्टी उखडली आहे. त्यामुळे दगडांनी दबलेले रुळ समतल करण्याचेही काम आवश्यक आहे; मात्र लाॅकडाऊन संपून इतके महिने लाेटले असतानाही वन विभागाने हे काम केले नाही. या काळात सेमिनरी हिल्सच्या सुरक्षा भिंतीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले; पण वनबालाच्या रुळाकडे पाठ फिरविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे अनलाॅकनंतर प्रशासनाच्या परवानगीने बालाेद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. नागरिकही कुटुंबासह येथे पाेहोचत आहेत; मात्र वनबाला धावत नसल्याने मुलांची निराशा हाेत आहे. त्यांना निराश हाेऊन परतावे लागते. वनबाला नेहमी बंद राहत असल्याची तक्रार नेहमीचीच झाली आहे.
१८ ते २० लाखाचा खर्च
रेल्वे रुळाच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी जवळपास १८ ते २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रक्कम अधिक असल्याने वन विभागाने हा प्रस्ताव डीपीडीसीकडे सादर केला. डीपीडीसीने मंजुरी दिल्यास लवकर काम सुरू हाेईल. तांत्रिक काम असल्याने रेल्वे विभाग आणि वन विभागाच्या अभियंत्यांच्या समन्वयातून हे काम हाेईल. मार्चनंतरच वनबाला सुरू हाेण्याची अपेक्षा विभागाचे अधिकारी प्रभुनाथ शुक्ल यांनी व्यक्त केली.
४२ वर्षांपासून मुलांसाठी आनंददायी
बालाेद्यानमध्ये ३ किलाेमीटरच्या राउंड ट्रॅकवर ही वनबाला धावत असते. डिसेंबर १९७८ साली तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वनबालाचे उद्घाटन केले हाेते. तेव्हापासून ही टाॅयट्रेन बच्चे कंपनीसाठी आनंददायी ठरली आहे; मात्र उदासीनतेमुळे ती अनेकदा बंद पडत असते. ताे आनंद कायम राहावा, अशी अपेक्षा आहे.