रियाज अहमद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनविभागाच्या उदासीनतेमुळे सेमिनरी हिल्सस्थित बालाेद्यानची ओळख असलेल्या वनबालेचे चाके अद्याप थांबले आहेत. लाॅकडाऊनमध्ये वनबालाच्या रेल्वे रुळाचे लाकडी स्लीपर खराब झाले आहेत. याशिवाय दगडांनी दबलेले रुळ समतल करण्याचेही काम आवश्यक आहे. मात्र लाॅकडाऊन संपून इतके महिने लाेटले असतानाही वनविभागाने हे काम केले नाही. या काळात सेमिनरी हिल्सच्या सुरक्षा भिंतीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले, पण वनबालाच्या रुळाकडे पाठ फिरविण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे अनलाॅकनंतर प्रशासनाच्या परवानगीने बालाेद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. नागरिकही कुटुंबासह येथे पाेहचत आहेत. मात्र वनबाला धावत नसल्याने मुलांची निराशा हाेत आहे. त्यांना निराश हाेऊन परतावे लागते. वनबाला नेहमी बंद राहत असल्याची तक्रार नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यावर प्रश्न उठणे साहजिक आहे. अनेकदा या दुर्लक्षाविराेधात आंदाेलन झाले, पण वनविभागाची झाेप उघडत नाही.
लाकडाचे स्लीपर आणले आहेत
रेल्वे रुळाच्या स्लीपरचे काम करायचे आहे. त्यांना बदलून समतल करणेही गरजेचे आहे. तांत्रिक काम असल्याने रेल्वे विभागाशी समन्वय साधून हे काम करायचे आहे. लाकडाचे स्लीपर आणण्यात आले आहेत. जुने स्लीपर बदलण्याचे काम बाकी आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल.
- विजय गंगवाने, आरएफओ, सेमिनरी हिल्स
...तर पुन्हा वनविभागाला घेराव करू
सामाजिक कार्यकर्ता रिजवान खान रुमवी यांनी वनविभागाच्या उदासीनतेमुळेच वनबाला नेहमी बंद राहत असल्याची टीका केली. वनबाला सुरू नसल्याने उद्यानात येणाऱ्यांची संख्या घटली आहे. विभागाने लक्ष दिले असते तर आतापर्यंत स्लीपरचे कार्य पूर्ण झाले असते. यापूर्वीही अशाचप्रकारे आंदाेलन झाल्यानंतर बंद पडलेली वनबाला सुरू करण्यात आली हाेती. यावेळीही लवकर कार्य पूर्ण करून वनबाला सुरू झाली नाही तर वनविभागाला घेराव करू, असा इशारा त्यांनी दिला.