लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या महागाईच्या विराेधात वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापून राज्य व केंद्र शासनाचा निषेध केला.
शुक्रवारी दुपारी संविधान चौक येथून हा मोर्चा निघाला. पोलीस वाहतूक कार्यालयाजवळ पोलिसांनी माेर्चा अडविला. कार्यकर्त्यांनी येथेच ठाण मांडले. यावेळी कार्यकर्त्यांनी चूल पेटवून भाकरी थापत सरकारचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात महागाई कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी,पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर वरील केंद्र व राज्य सरकारचे वेगवेगळे कर रद्द करून एकच GST लावण्यात यावा. लाॅकडाउन काळातील विजेचे बिल व पाण्याचे बिल पूर्णपणे माफ करावे, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना ५ हजार रुपये महिना देण्यात यावा. सर्व शिधापत्रिका धारक परिवारांना कोणतीही अट न घालता तात्काळ अन्नधान्य मोफत द्यावे, झोपडपट्टी धारकांना रहिवाशी मालकी पट्टे द्यावे, रमाई घरकूल योजनेचा निधी लाभार्थ्यांना तात्काळ द्यावा, सर्वच प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, मागासवर्गीयांची रिक्त पदे तात्काळ भरावी, मागासवर्गिय पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अंबाझरी स्थित ऐतिहासिक आंबेडकर भवनाचे तात्काळ पुनःनिर्माण करण्यात यावे, सोबतच पटवर्धन ग्राउंड वर प्रस्तावित आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.
आंदोलनात वंचितचे शहर अध्यक्ष रवी शेंडे, जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर, राजू लोखंडे, कुशल मेश्राम, राहूल वानखेडे, मुरलीधर मेश्राम, प्रफुल मानके, विवेक हाडके, भगवान भोंडे, अरविंद सांदेकर, नितेश जंगले, नागेश बुरबुरे, धर्मेश फुसाटे, राहुल दहिकर, मिलिंद मेश्राम, सुमेध गोंडाणे, सिद्धांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.