नागपूर, दि. 29 - स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मातरम’ने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली होती. राष्ट्रचेतनेचे व शक्तीचे प्रतिक असलेले हे गीत आहे. मात्र आता धर्माच्या नावावर ‘वंदे मातरम्’ला होणारा विरोध हा अतिशय खेदजनक प्रकार आहे. ज्याला ‘वंदे मातरम्’ कळते त्याला देश कळतो, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. वामन गाणार लिखित ‘अंदमान की व्यथा, निकोबार की कथा’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.‘वंदे मातरम्’ या गीताने देशभरात स्फुल्लिंग जागविले होते. त्याला धर्म, पंथाच्या मर्यादा नव्हत्या. क्रांतिकारक अशफाक उल्ला खान यांनी तर फाशीवर जाताना ‘वंदे मातरम’चाच नारा दिला होता. असे असताना धर्माच्या नावावर आता याच गीताला विरोध होत आहे ही दुर्दैवी बाब आहे, असे सुधाकर गायधनी म्हणाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत अगणित लोकांनी हौतात्म्य पत्करले. मात्र अद्यापही स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळेच स्वातंत्र्याची किंमत लोकांना कळत नाही, असे मत नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केले.
‘वंदे मातरम’ला विरोध खेदजनकच - सुधाकर गायधनी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 9:26 PM