नागपूर, दि. 14 - देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदे मातरम् आवाज देशात टिकला पाहिजे. वंदे मातरम् वरून राजकारण व्हायला नको. असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी केले. मातृभूमी प्रतिष्ठान नागपूरतर्फे सक्रदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिन सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे,नागो गाणार, डॉ. उपेंद्र कोठेकर, आयोजक डॉ. रविंद्र भोयर, सत्कारमूर्ती निवृत्त बिग्रेडियर रुपचंद जैस आदी उपस्थित होते. 2014 च्या निवडणुकीनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देशाला स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा देश बनवायचा आहे. त्यांनी 2022 सालापर्यत भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प केला आहे. आईच्या चरणात नतमस्तक होण्यासाठी वंदे मातरम् म्हणण्यात गैर काय अशी भूमिका संबीत पात्रा यांनी मांडली. देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद बिघडला आहे. अतिराष्ट्रवाद होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काही लोकांकडून केला जात आहे. परंतु देशाला शांती देणारी संस्कृती राष्ट्रवाद कसा बिघडवणार असा सवाल त्यांनी केला.
वंदे मातरम् वरून राजकारण व्हायला नको - संबीत पात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 10:10 PM