योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवू हा भाजपचा दावा पोकळ ठरला. महाविकासआघाडीच्या अभिजित वंजारी यांनी केवळ विजयच मिळविला नाही तर त्यांनी भाजपचा ‘रेकॉर्ड’देखील तोडला. २००८ साली सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५२ हजार ७६१ मते प्राप्त झाली होती. यंदा वंजारी यांना प्रथम पसंतीक्रमाची ५५ हजार ९४७ मते मिळाली व ते मागील १८ वर्षातील सर्वाधिक मते घेणारे उमेदवार बनले.
२०१४ च्या निवडणूकीत भाजपचे अनिल सोले यांनी ५२ हजार ४८४ मते घेतली होती व त्यांचे मताधिक्य ३१ हजार २५९ इतके होते तर गडकरी यांनी २००८ साली २३ हजार ८३५ मतांनी विजय मिळविला होता. मताधिक्याचा ‘रेकॉर्ड’ मात्र वंजारी यांना तोडता आला नाही. त्यांनी १८ हजार ९१० इतके मताधिक्य घेतले.
दरम्यान, वंजारी यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेण्यास सुरुवात केली. पहिल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या फेरीत वंजारी यांच्या आघाडीचा आकडा ४ हजार ८५० इतका होता. त्यानंतर सातत्याने वंजारी यांनी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीत २ हजार ४१२, तिसऱ्या फेरीत २ हजार ३४९, चौथ्या फेरीत ३ हजार ९६ तर पाचव्या फेरीत १७०० मतांची आघाडी घेतली.
११ हजार अवैध मते
या निवडणूकीत अवैध मतांचादेखील ‘रेकॉर्ड’च झाला. मागील निवडणूकीत ५ हजार ९७३ मते अवैध ठरली होती. मात्र यंदा हा आकडा जवळपास दुपटीने वाढला. ११ हजार ५६० मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतपत्रिकेवर मत नोंदविले. नियमानुसार मतपत्रिकेवर इंग्रजी, रोमन किंवा स्थानिक भाषेत केवळ आकडा लिहायचा होता. मात्र अनेकांनी चक्क अक्षरात मत नोंदविले. काही जणांनी बरोबरची खूण केली तर काहींनी चक्क स्टारदेखील केले. पदवीधरच्या निवडणुकीतील मतदार हे सुशिक्षित असतात. मात्र अशा प्रकारांमुळे हे सुशिक्षित ‘अडाणी’ मतदार चर्चेचा विषय बनले होते.
फेरीनिहाय मते
उमेदवार - फेरी १ - फेरी २ - फेरी ३ - फेरी ४ - फेरी ५
अभिजित वंजारी - १२,६१७ - ११,४९७ - ११,३९५ - ११,८६२ - ८,५७६
संदीप जोशी - ७,७६७ - ९,०८५ - ९,०४६ - ८,७६६ - ६,८७६
फेरीनिहाय अवैध मते
फेरी -अवैध मते
१ -२,२३४
२ -२,५३५
३ -२,४५९
४ -२,४०२
५ -१,९३०