नागपूर : वंजारीनगर ते अजनीतील रेल्वे सामुदायिक भवनपर्यंतच्या उड्डानपुलाचे काम पूर्ण झाले आहे. उड्डानपुलाचे दि. २३ जानेवारी रोजी लोकार्पण केले जाणार आहे. केवळ ५२४ मीटर लांब असलेल्या या उड्डानपुलामुळे तब्बल दीड किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
पुलाला व्हिजन व साउंड बॅरिअर लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात ध्वनिप्रदूषण होणार नाही व पुलाबाहेरून वाहणे जाताना-येताना दिसणार नाही. व्हिजन व साउंड बॅरिअर लावलेला हा शहरातील एकमेव उड्डानपूल आहे. उड्डानपुलाच्या कामाचे दि. ३ जानेवारी २०१९ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार डी. बी. पटेल कंपनीला १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. परंतु, कोरोना संक्रमणामुळे कामाला सहा महिने विलंब झाला. परंतु, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कामाच्या तुलनेत हे काम लवकरच पूर्ण झाले. अशीच गती कामठीरोड रुंदीकरण व आरयूबी, आउटर रिंगरोडवरील पुले इत्यादी कामांमध्येही दाखविणे आवश्यक झाले आहे.
-----
सहा लेनचा पूल
हा पूल सहा लेनचा बांधण्यात आला आहे. अजनी परिसरात प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पानुसार या पुलाची रचना करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप-विभागीय अभियंता (डिव्हिजन-३) वैशाली गोडबोले यांच्या निरीक्षणाखाली पुलाचे बांधकाम करण्यात आले. यासाठी त्यांना मुख्य अभियंता संजय देशपुते, अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख व कार्यकारी अभियंता दिलीप देवळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------
ध्वनी प्रदूषण कमी होईल
परिसरातील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नये याकरिता या पुलाला व्हिजन व साउंड बॅरिअर लावण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जाणारी येणारी वाहने दिसणार नाहीत. तसेच, साउंड बॅरिअरमुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही. भविष्यात हा पूल विविध बाबतीत उपयोगी सिद्ध होईल.
- वैशाली गोडबोले,
उप-विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, डिव्हिजन-३.