लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचा अभेद्य किल्ला अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. ‘अभी या कभी नहीं’ अशा रंगलेल्या या निवडणुकीत वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारली. १७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर वंजारी यांनी मतांचा कोटा पूर्ण केला व त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा १८ हजाराहून अधिक मतांनी पराभव करत भाजपच्या प्रचारयंत्रणेला अक्षरशः धूळ चारली. वंजारी यांचा राज्यपातळीवरील निवडणुकीतील हा पहिलाच विजय ठरला हे विशेष.
कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. मध्यरात्री दोनच्या सुमारास चौथ्या फेरीअखेर वंजारी १२ हजार ७०७ मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर पाचव्या फेरीची मतगणना सुमारे दोन तास चालली व पहाटे सव्वा चारच्या सुमारास पाचव्या फेरीचा निकाल घोषित झाला. पाचव्या फेरीअखेर वंजारी यांच्याकडे १४ हजार ४०७ इतके मताधिक्य होते. वैध मतांची आकडेवारी लक्षात घेता विजयासाठी ६० हजार ७४७ चा कोटा निश्चित करण्यात आला. मात्र एकाही उमेदवाराला इतकी मते न मिळाल्याने दुसऱ्या मतमोजणीला सुरुवात झाली.
शुक्रवारी दुपारी १७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर वंजारी यांनी मतांचा कोटा पूर्ण केला. त्यांना ६१ हजार ७०१ तर संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते प्राप्त झाली. वंजारी यांनी १८ हजार ७१० मतांनी जोशी यांचा पराभव केला.
कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष
विभागीय क्रीडासंकुलासमोर मध्यरात्रीनंतरच जल्लोषाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळी काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील एकत्रित आले. वंजारी यांच्या स्वागतासाठी दुपारपर्यंत कार्यकर्ते उपस्थित होते व जोरदार जल्लोष करण्यात आला.
वंजारी यांनी सहकुटुंब घेतले प्रमाणपत्र
विजयाची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घोषणा झाली. अभिजित वंजारी यांनी कुटुंबासमवेत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कमार यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र घेतले. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक हेदेखील उपस्थित होते.
विजयाची दिल्लीपर्यंत चर्चा
पदवीधरच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते मागील कित्येक महिन्यांपासून कामाला लागले होते. तळागाळापर्यंत संपर्कावर भर देण्यात आला. हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा विजय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपचा वरचष्मा असलेल्या मतदारसंघात विजय मिळविला असल्यामुळे याची चर्चा दिल्लीपर्यंत होणार आहे.
-अभिजित वंजारी, विजयी उमेदवार, महाविकास आघाडी
कार्यकर्त्यांचे आभार
निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्वांनी खूप प्रयत्न केले, मात्र विजय मिळू शकला नाही याचे दुःख निश्चितच आहे. मात्र सर्वांच्या सहकार्यासाठी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. आयुष्यभर कार्यकर्ते नेहमी सोबत राहतीलच हा विश्वास आहे.
-संदीप जोशी, पराभूत उमेदवार, भाजप